भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल आणि आज अशी दोन दिवस संविधानावर चर्चा पार पडली. या चर्चेत सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षांचे आमदारही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संविधान निर्मितीचा इतिहास आणि त्यामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावरही प्रकाश टाकला. “जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत भारताचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही. त्यामुळे संविधानाला कोणताही खतरा नाही”, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. तसेच त्यांनी आणीबाणीच्या काळात त्यांच्या वडिलांना दोन वर्षे तुरुंगवास झाल्याची आठवणही सांगितली.
संविधानावर बोलताना देवेंद्र फडणीवीस म्हणाले, “आणीबाणीच्या काळात, वडील आणि काकूंना दोन वर्षांचा तुरुंगवास सहन करावा लागला. विरोधी पक्षांच्या एक लाखापेक्षा जास्त लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते.”
यावेळी देशातील संस्थांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तुम्ही बघा देशाच्या सर्व संस्थांना कलंकित करायचे, त्याच्यावर बोटे उचलायची, त्या संस्थांना एकप्रकारे अराजकाकडे न्यायचे हे चाललेले आहे. आपल्याला सत्तेत येता येत नाही मग अशाप्रकारे देशाच्या संस्था बदनाम करायच्या. या संस्था आपण जेव्हा बदनाम करतो, तेव्हा आपण संविधानावर अविश्वास दाखवतो. कारण या संविधानाने या संस्था निर्माण केल्या आहेत. या संस्था इतक्या भक्कम करण्यात आल्या आहेत की, त्या कोणी तोडू शकणार नाही. त्यामुळे कोणीही जन्माला आले तरी या संविधानाने तयार केलेल्या संस्थांचे काही वाईट होऊ शकणार नाही.”
Leave a Reply