राष्ट्रवादी काँग्रेसने”राष्ट्रवादी हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’ असे अभियान सुरू केले असून यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचा एक स्कॅनर कोड देखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये स्कॅन करून थेट या अभियानात कनेक्ट होता येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या नव्या अभियानामुळे सोसायटीशी संबंधित समस्यांचे निराकरण होणार आहेच शिवाय या बारकोड ॲपच्या माध्यमातून संबंधित पक्षाच्या पदाधिकांऱ्याशी चर्चा करून तुमच्या सोसायटीच्या समस्या सोडवू शकणार आहात. सध्याच्या घडीला मुंबईसह महाराष्ट्रात अडीच लाखांहून अधिक गृहनिर्माण सोसायट्या असून राष्ट्रवादी काँग्रेस या नवीन अभियानाच्या माध्यमातून लोकांना थेट कनेक्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असेही उमेश पाटील म्हणाले.सोसायटी धारकांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्याशी समन्वय साधण्यासाठी पक्ष म्हणून त्याठिकाणी हाऊसिंग सोसायटीपर्यंत पोचण्यासाठी आणि सहकार विभागाच्या ज्या ज्या योजना आहेत. त्या पोचवण्यासाठी शिवाय विकासक व सोसायटीधारक यांच्यातील जमीन प्रश्न असेल त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार आहे असेही उमेश पाटील यांनी सांगितले.
या अभियान ॲपचा राज्य समन्वयक म्हणून योगेंद्र गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ॲपच्या स्कॅनरवर स्कॅन केल्यावर थेट राष्ट्रवादीच्या या उपक्रमात लोक कनेक्ट होणार आहेत. मोठमोठ्या शहरात हाऊसिंग सोसायटया आहेत. यांचे प्रश्न राष्ट्रवादीच्या बॅनरखाली सोडविण्यासाठी एक समन्वय सेतू म्हणून योगेंद्र गायकवाड आणि त्यांचे अनेक सहकारी पूर्ण राज्यात काम करणार आहेत. प्रत्येक सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक समन्वयक नेमण्यात येणार आहे असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक सोसायटीमध्ये कमिटी असते. सोसायटीमध्ये दहा – बारा वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वर्षे राहूनही सभासदांना, सोसायटीच्या प्लॅटधारकांना जमीनीची मालकी कुणाची आहे हे माहीत नसते. फक्त चार भिंतीची मालकी त्यांची असते. आणि भूखंडावर मालकी विकासकाच्याच नावावर असते. हे जिथे जिथे प्रलंबित आहे तिथे शासनस्तरावर पाठपुरावा करून ते प्रश्न अग्रक्रमाने शासनाकडे पोचावेत शिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हे प्रश्न जावेत यासाठी अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जो विषय दुर्लक्षित राहिला आहे. म्हणून हा नवीन विभाग सुरू करण्यात आला आहे. हाऊसिंग सोसायटी व त्यामध्ये काम करणाऱ्या सभासदांनी, संचालकांनी ‘राष्ट्रवादी हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’ या उपक्रमात सहभाग नोंदवा आणि आपले प्रश्न तात्काळ सोडवा असे आवाहनही उमेश पाटील यांनी यावेळी केले.