kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘समोर कोणी असो, अमितला निवडून आणणारच’ ; लेकासाठी ‘राज’ गर्जना!

माहिम दादर विधानसभा मतदार संघातून अनेक आमदार खासदार झाले. या माहित दादर मध्ये प्रबोधन करत ठाकरेंच्या तीन पिढ्या गेल्या. त्यानंतर ठाकरे पहिल्यादा याच दादर माहिम मतदार संघातून निवडणूक लढत आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी मतदारांना भावनिक साद घातली. समोर कोणी असोत अमितला निवडून आणणार म्हणजे आणणारचं अस निर्धारही राज ठाकरे यांनी बोलून दाखवला. माहित मतदार संघातून अमित ठाकरे हे मनसेकडून मैदानात आहे. त्यांच्या प्रचाराची सभा राज ठाकरे यांनी प्रभादेवी इथं घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

आमच्या तिन पिढ्या प्रबोधन करण्यात गेल्या. आता या दादरमध्ये पहिल्यांदा ठाकरे उभा रहातोय असं यावेळी राज ठाकरे म्हणाले. अमितसाठी एकच सभा घेणार आहे. प्रत्येक उमेदवारासाठी शक्य तेवढ्या सभा देत आहे असं ही ते म्हणाले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. 2006 साली शिवसेना सोडली. माझा वाद विठ्ठलाशी नाही तर माझा वाद बडव्यांशी आहे असं त्यावेळी सांगितलं होतं. ज्यावेळी बाहेर पडलो त्यावेळी 37-38 आमदार माझ्याकडे आले होते. त्यात 7-8 खासदार ही होते. सत्तेत जावू असं त्यांचे म्हणणे होते. पण माझा वाद बाळासाहेबां बरोबर नाही. त्यामुळे पक्ष फोडणार नाही असं त्यांना स्पष्ट सांगितलं होतं असं राज यांनी यावेळी सांगितलं.

अनेक जणांनी शिवसेना सोडली. पण मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. माझी घुसमट होते असं मी बाळासाहेबांना सांगितलं होतं. त्यांना मी इथं राहाणार नाही हे समजलं होतं. त्यावेळी त्यांनी मला शेवटची मिठी मारली. त्यांनीच मला तू जा असं सांगितलं. त्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडलो असं यावेळी आवर्जून सांगितलं. त्यानंतर मला पक्ष फोडायचा नव्हता. माझ्या हिमतीवर आमदार खासदार निवडून आणायचे होते. कोणताही दगा देवून शिवसेनेतून बाहेर पडलो नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं. उद्धव ठाकरे आजारी होते त्यावेळी सर्वात आधी मी गाडी घेवून निघालो होता. बाळासाहेबांनी मलाच फोन केला होता. मी कुटुंबाच्या आड कधी आलो नाही. हे सांगत का शिवसेना सोडली याचं स्पष्टीकरणच त्यांनी या सभेत दिलं.

आदित्य वरळीत उभा राहणार होता. ठाकरे घरातलं कोणी तरी पहिल्यांदा निवडणूक लढत होतं. त्यामुळे तिथे मनसेचा उमेदवार द्यायचा नाही असं ठरवलं होतं. तिथे मनसेची तीस ते पस्तीस हजार मतं आहेत. तो पाठिंबा स्वत:हून दिला होता. त्यामुळे यावेळी मी अमितसाठी भिका मागत फिरणार नाही. त्यावेळी मला जे चांगल वाटलं ते केलं असं ही ते म्हणाले. अमित निवडणुकीला उभा राहील हे लोकसभेला वाटलं नव्हतं. मनात सुद्धा नव्हतं. त्याच्या ही मनात नसेल. त्यामुळे निवडणुकीचा विषयच आमच्या घरात नव्हता. पण त्याच्या बरोबर चर्चा केल्यानंतर त्याने निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं होतं.

लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावेळी मी कोणाकडे स्वत:हून पाठिंबा मागणार नाही. तुमच्याकडून जे होणार असेल ते करा. नाही तर नका करू. त्यामुळे उमेदवार मागे घ्या वैगरे या भानगडीत पडलो नाही. ज्यांना लढायचं आहे त्यांनी लढावं. आम्ही ही लढण्यासाठी तयार आहोत. शेवटी काही झालं तरी अमितला नक्की निवडून आणणार असा निर्धार यावेळी राज ठाकरे यांनी केला. अमित यांच्या विरोधात उभे असलेल्यांची अंडीपिल्ली मला माहित आहेत. मी त्यांची अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो असेही राज यावेळी म्हणाले.

जे इथं उमेदवार आहेत ते बाळासाहेबांचे होवू शकले नाहीत ते तुमचे काय होणार असं सांगत राज यांनी सदा सरवणकर यांच्यावर हल्लाबोल केला. बाळासाहेब असताना ते काँग्रेसमध्ये गेले. तिथे पराभव झाला. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत गेले.तिथून आमदार झाले. शिंदेंनी बंड केलं. त्यावेळी सकाळी शिंदेंना शिव्या दिल्या आणि संध्याकाळी शिंदेंकडेच गेले. ही कोण माणसं आहेत तुम्हाला माहित आहे. तर दुसरे उमेदवार हे बाळासाहेब असतानाच काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढली होती. ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्याबद्दल ते बोलत होते. अशा लोकांवर विश्वास ठेवता येत नाही असंही राज यांनी आवर्जून सांगितले.

त्यामुळे थकलेली, हुकलेले लोकं विधानसभेत पाठवू नका. तुमच्या हाकेला चोविस तास ओ देतील अशीच माणसं निवडा. अमित राज ठाकरे असं नाव जरी असेल तरी तो तुमच्या भेटीसाठी चोविस तास उपलब्ध असेल. त्याला भेटण्यासाठी कोणत्याही अपॉईन्टमेंटची गरज असणार नाही असं राज ठाकरे यांनी यासभेत सांगितलं. शिवाय सर्वच उमेदवारांनी एक क्रमांक आपल्या मतदारांना द्यावा. ज्यावर ते चोविस तास किंवा त्यांची माणसं उपलब्ध असतील अशा सुचना केल्याचे ही त्यांनी सांगितले. यावेळी, शेवटी त्यांनी मनसेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.