kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

आषाढी एकादशीनिमित्त राज ठाकरेंचं विठुरायाला एकच साकडं… ‘माझ्या महाराष्ट्रात…’

आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने विठ्ठलाची पूजा केली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी हात जोडून एक प्रार्थना केली आहे. महाराष्ट्रात पसरत चाललेलं जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे, अशी प्रार्थना ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी केली आहे.

राज ठाकरे आपल्या संदेशात लिहितात, ‘आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं.’

‘गेले एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष खोलवर रुजत चालले आहे. जेंव्हा अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही.’ अशी चिंता राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.