राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकतो, अशी टीका केली होती. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानचा झेंडा माझ्या सभेत नाही, तर देवेद्र फडणवीसांच्या मनात फडकतो” त्यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

यादरम्यान, त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “मला देवेंद्र फडणवीसांकडून नवाज शरीफ यांच्या नंबर घ्यायचा आहे. कारण पंतप्रधान मोदी नवाज शरीफांच्या वाढदिवसाला न बोलवता वाढदिवसाला गेले होते. त्यानंतर आडवणी पाकिस्तानात जाऊन जिनांच्या कबरीवर डोक टेकवून आले होते. त्यामुळे पाकिस्तानचा झेंडा यांच्या मनात फडकतोय”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी वोट जिहादच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. वोट जिहाद असं काहीही नाही. “मुळात यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे. सगळे गद्दार भ्रष्टाचारी भाजपात जात आहेत. त्यांच्याकडे निवडणुका लढवायला माणसे नाही. हे दुसऱ्यांच्या पक्षातील माणसे चोरत आहेत, मग याला काय ‘चोर जिहाद’ म्हणायचे का? यांनी सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेतलं आहे. आणि आता हे आम्हाला शहाणपण शिकवत आहेत”, असे म्हणाले.

नाशिकमधील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंच्या सभेत पाकिस्तानचा झेंडा पडकतो, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. राहुल गांधींसाठी पाकिस्तानाचे मंत्री पोस्ट करत आहेत. आम्हाला वाटलं की उद्धव ठाकरे वेगळे असतील. पण मला आश्चर्य वाटतं की परवा उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता. काय दुर्दैव आहे बघा, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांसाठी जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी देशभक्त मोदींच्या पाठीशी उभे राहतील, असे ते म्हणाले होते.