kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, ‘या’ दिवशी शपथविधी

राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. २३ नोव्हेंबर रोजी एकत्रित निकाल जाहीर झाले. २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत २३५ जागा महायुतीच्या वाट्याला गेल्या. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. परंतु, निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीकडून सत्ता स्थापनेकरता उशीर करण्यात आला. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिपदाकरता जोरदार रस्सीखेच अद्यापही सुरू आहे. त्यामुळे राज्यात नवं सरकार कधी स्थापन होणार असा प्रश्न सातत्याने विचारला गेला. दरम्यान, आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स पोस्ट करून शपथविधीबाबत महत्त्वाची माहिती दिली. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा सोहळा रंगणार असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही येणार आहेत.

राज्यात मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावरून अद्याप तिन्ही पक्षांमध्ये सहमती झालेली नाही. महायुती सरकारच्या रचनेबाबात अमित शहा यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गुरुवारी रात्री सुमारे तीन तास बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच असतील, हे स्पष्ट करण्यात आले. पण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागण्यांमुळे गाडी अडल्याचे सांगण्यात येते. एवढे प्रचंड बहुमत मिळूनही विधिमंडळ नेता निवडीसाठी आमदारांची साधी बैठकही अद्याप होऊ शकलेली नाही. भाजपच्या आमदारांमध्येही ही अस्वस्थता जाणवते.

दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली. भाजपाचा मुख्यमंत्री होणार असून महायुतीतील इतर दोन प्रमुख घटकपक्षातील प्रत्येकी एक-एक असे दोन उपमुख्यमंत्री राज्याला लाभणार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.