Breaking News

अटल सेतूला 5 महिन्यांमध्येच भेगा गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल ; MMRDA नं दिलं स्पष्टीकरण

अटल सेतू हा पूल आता मुंबई आणि महाराष्ट्राची नवी ओळख बनलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच महिन्यापूर्वी मुंबईहून रायगडला अवघ्या 20 मिनिटांमध्ये पोहचवणाऱ्या अटल सेतूचं लोकार्पण केलं होतं. सुपरफास्ट पूल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं गेलं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी मुंबई आणि परिसरात केलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांची यादी जवळ जवळ प्रत्येक भाषणात वाचली. पण, अटल सेतूला 5 महिन्यांमध्येच भेगा पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. काँग्रेसनंही या प्रकरणात सरकारला लक्ष्य केलंय. तर या प्रकरणावर अखेर MMRDA नं यावर स्पष्टीकरण दिलंय. बघूया काँग्रेसचा आरोप आणि MMRDA नं दिलेलं स्पष्टीकरण काय आहे.

काँग्रेसचा आरोप काय?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूला भेट दिली. त्यानंतर त्यांनी या प्रश्नावर सरकारवर टीका करणारं ट्विट केलंय. ‘अटल सेतू” पुलास भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे. मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहार मध्ये नवनिर्मित पुल कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सरकारच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाचा भाग म्हणून सरकारचा भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत या पुलाची पाहणी केली. सदर बाब अत्यंत गंभीर असून आदरणीय उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे,’ असं ट्विट पटोले यांनी केलं.

MMRDA चं स्पष्टीकरण

दरम्यान, या संपूर्ण मुद्यावर MMRDA नं स्पष्टीकरण दिलंय. अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून विविध माध्यमांतून त्याबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोचमार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. सदर पोहाचमार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नसून त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.