कर्जत-जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांना सीआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी अडवलं आहे. रोहित पवार सीआरपीएफ केंद्रावर पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. जामखेड तालुक्यात सीआरपीएफ केंद्राचं लोकार्पण वादात सापडलं आहे. केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आमदार राम शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जामखेडमधील कुसडगावामध्ये एसआरपीएफ केंद्राच्या लोकार्पणावरुन वाद निर्माण झाला. लोकार्पणाला प्रशासनाचा विरोध आहे. यावेळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार होतं. आमदार रोहित पवार यांनी या लोकार्पणाचं आयोजन केलं होतं. पण पोलिसांकडून रोहित पवारांना कार्यक्रमस्थळी आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांकडून देवेंद्र फडणवीस आणि राम शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
रोहित पवारांनी याबाबत ट्विट करत भूमिका मांडली आहे. “राज्यात महिला भगिनी आणि चिमुकल्या मुलींवर खुलेआम अत्याचार होतात. दिवसाढवळ्या खून पडतात. कायदा आणि सुव्यवस्थेचे न भूतो न भविष्यती तीन तेरा वाजले. तरी तिकडं लक्ष द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांना वेळ नाही. मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या आणि पूर्ण केलेल्या कुसडगावच्या (ता. जामखेड) SRPF केंद्राची पाहणी करु न देण्यासाठी असा शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावला जातोय. तुम्ही कितीही लावा बंदोबस्त. स्वाभिमानी जनताच करणार तुमचा बंदोबस्त”, अशी टीका रोहित पवारांनी यावेळी केली.
एसआरपीएफ केंद्राबाहेर रोहित पवार यांच्यासोबत शरद पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते जमले आहेत. या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. रोहित पवार केंद्रात प्रवेश करण्यासाठी आग्रही आहेत. पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला आहे. “आम्हाला एसआरपीएफ केंद्र फक्त बघायचं आहे. ते बघायला आम्हाला परवानगी द्या. आम्ही लागलं तर जो कार्यक्रम घ्यायचा आहे तो घेणार नाही. आम्ही बाजूला तो कार्यक्रम करु. पण आम्हाला आतमध्ये जाऊद्या. जे कुणी आदेश देणारे आहेत ते आता केवळ दोन महिन्यांचे पाहुणे आहेत”, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.