Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मागितली माफी म्हणाले ….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. पण अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला. या घटनेमुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली. विरोधक राज्य सरकारवर तुटून पडले. या घटनेनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचं भूमीपूजन झालं. तसेच अनेक विकासकामांचं उद्घाटन झालं. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली. “सिंधुदुर्गात जे झालं. ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“भारताचे महान सपुत वीर सावरकरांना शिव्या देतात. अपमानित करतात असे लोक आम्ही नाहीत. देशभक्तांच्या भावनांचा चुरडा करतात. सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही. हे यांचे संस्कार आहे. मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहे. आमच्यासाठी अराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठं नाही”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.

दरम्यान, मोदी यांनी वाढवण बंदराविषयी देखील यावेळी माहिती दिली. “या पोर्टवर ७६ हजार कोटीहून अधिक जास्त रक्कम खर्च करणार आहोत. हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट असेल. देशच नाही तर जगातील सर्वात मोठं पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचं काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाजा लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचं किती मोठं केंद्र होईल”, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.