Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर आभार…

मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात दिवाळी साजरी करणारा म्हणजे लक्ष्मी आपल्या पायाने मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये चालत आली आहे अशाप्रकारची भावना देशातील तमाम मध्यमवर्गीय कुटुंबात निर्माण झाल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी अर्थसंकल्पावर माध्यमांशी मांडले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडला. त्यावर आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.

या अर्थसंकल्पामध्ये १२ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली ही खूप मोठी राजकीय ताकद असा निर्णय घ्यायला लागते कारण देशाच्या तिजोरीतून एक लाख कोटी रुपये कररुपात येत होते आणि इनडायरेक्ट रुपाने २६०० कोटी रुपये जो कर येत होता तो फार मोठा दिलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आनंद परांजपे यांनी आभार मानले.

हा अर्थसंकल्प देशाला दिशा देणारा… देशातील कष्टकरी, शेतकरी, महिला, युवक, या सर्वांना समावेशक आणि एका विकासाच्या मार्गावर नेणारा अर्थसंकल्प आहे अशा शब्दात आनंद परांजपे यांनी कौतुक केले.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही देशातील १०० जिल्हयातील कृषीला अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावीपणे राबवली जाणार आहे. पुढील सहा वर्षांमध्ये देशाला कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर करण्यात येणार आहे. मिशन कॉटन प्रॉडक्टीव्हिटी ही देखील नवीन योजना आज जाहीर करण्यात आली आणि किसान क्रेडिट कार्डचे लिमीट ३ लाखावरुन ५ लाखापर्यंत करण्यात आले आहे. आसाममध्ये युरीया प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळेही देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा हा अर्थसंकल्प ठरणार आहे असेही आनंद परांजपे म्हणाले.

एमएसएमईमधून १० कोटी लोकांना रोजगार मिळतो आणि ३६ टक्के मॅन्युफॅक्चरिंग होते. व भारतातील ४५ टक्के एक्स्पोर्ट प्रोडक्शन एमएसएमईमधून होते. या क्षेत्रालादेखील दिलासा दिला आहे. क्रेडिट लिमीट ५ कोटींवरुन १० कोटी रुपये करण्यात आले आहे. स्टार्टअप करणार्‍या एमएसएमईला १० कोटींवरुन २० कोटीचे अर्थसहाय्य मिळणार आहे. नवीन येणार्‍या एआय टेक्नॉलॉजीसाठी तीन केंद्र उभारण्यात येणार असून त्यामध्ये कृषी, आरोग्य आणि इनोव्हेशनचा समावेश आहे आणि यासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आयआयटीमध्ये ६ हजार ५०० जागा वाढवल्या जाणार आहेत आणि भारतात डॉक्टरांची संख्या अधिक कशी वाढेल यासाठी दहा हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती – जमातीमधील पाच लाख महिला उद्योजकांना २ कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध केले जाणार आहे, असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

येत्या दहा वर्षात १२० नवीन विमानतळ उघडण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे. मरिनटाईम बोर्डातर्फे २५ हजार कोटींची गुंतवणूक भारत सरकार करणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील वाढवण बंदराला गती देण्यासाठी होणार आहे. हातगाडीवर आपले जीवनमान चालवणार्‍या लोकांना कोविडकाळात दहा हजार रुपयांचे कर्ज जाहीर करण्यात आले होते त्याचे लिमीट आता ३० हजार रुपये करण्यात आले आहे. २०४७ पर्यंत १०० गीगावॅट आण्विक ऊर्जेचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. पर्यटन स्थळांच्या माध्यमातून नवा रोजगार निर्माण करण्यासाठी ५० नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्यात येणार आहेत. तंत्रज्ञानातील संशोधनासाठी पुढील पाच वर्षांत १० हजार फेलोशिप देण्याची घोषणा करण्यात आली आहे याचा फायदा विद्यार्थी वर्गाला होणार आहे. विशेष म्हणजे ३६ औषधांना कस्टम्स ड्युटीमधून वगळण्यात आले असून यामध्ये कॅन्सरवरील औषधांचा समावेश असून त्यामुळे पिडीतांना याचा फायदा होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० हजारांवरून एक लाखापर्यंत टीडीएस मर्यादा करण्यात आली आहे तोही फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे असेही आनंद परांजपे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *