मनसेच्या पाडव्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दर्शवत लोकसभा निवडणूक नसल्याचे जाहीर केले. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली. राज ठाकरे हे भाजपच्या दबावाखाली झुकले, असा प्रचार महाविकास आघाडीतील नेते करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर सडकून टिका केली. राज ठाकरे शक्तीहीन झालेला वाघ आहे. लोकांना दात निघालेला, नखं काढलेला आणि नुसता तोंडाने हवा मारणारा वाघ नकोय, असे किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

“महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंना पत्रकार परिषद घेण्याची गरज काय होती? इतर पक्ष निवडून आल्यानंतर आपली भूमिका बदलतात, मग मी का बदलू नये, असे राज ठाकरे म्हणतात. पण राज ठाकरेंचा पक्ष स्थापन झाल्यापासून सातत्याने भूमिका बदलत आहे. २०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरेंची ‘लाव रे तो व्हीडिओ’ ही टॅगलाईन लोकप्रिय झाली. पण त्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेत बदल केला. एवढेच नव्हेतर अनेकवेळा त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलला. आधी निळा, मग हिरवा त्यानंतर थोडासा भगवा असे करत राज ठाकरेंनी अनेकदा झेंडे बदलले. यामुळे असा दात निघालेला, नखं काढलेला आणि नुसता तोंडाने हवा मारणारा वाघ लोकांना नकोय, असे किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.