बारामती लोकसभा मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी त्यांच्या भूमिकेवरून यू टर्न घेतला आहे. त्यांनी बारामती मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. तसेच अजित पवार यांच्यावर टीका देखील केली होती. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर आज शिवतारे यांनी त्यांची तलवार म्यान करत बारामती लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले सासवड येथे पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांसमोर त्यांची भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणाले विजय शिवतारे ?

मी लोकसभा निवडणूक लढणार होतो. तसे मी जाहीरपणे बोललो. ५ लाख ५० हजार पवार विरोधी मते विभागण्यासाठी मी तिसरा पर्याय म्हणून निवडणूक लढणार होतो. माझ्या या भूमिकेबाबत मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांना माझी भूमिका पटली नाही. त्यांनी मी लढल्यास काय होईल याची देखील चर्चा केली. दरम्यान, मी माघार घ्यावी या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संगितले होते. त्यांचा मला फोन देखील आला होता. मात्र, मी माझ्या निर्णयावर ठाम होतो, मात्र, याचा फटका जवळपास १० ते २० लोकसभा मतदार संघावर झाला असतात. येथील उमेदवार पडू शकतात असे मला सांगण्यात आले. माझ्या भूमिकेमुळे महायुतीचे नुकसान झाले असते, परिणामी मी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत असून नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे’ ,मी निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार केला होता. मी आमदार, खासदार झाल्यावर काय केले असते असे म्हणून टीका देखील करण्यात आली. भूमिकेबाबत माझी उपमुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांशी दोनवेळा चर्चा झाली. मला माघार घेण्यास सांगण्यात आले. तरी सुद्धा मी माघार घेतली नाही. मला या मतदार संघातील अनेकांनी पाठिंबा देखील दर्शवला. मात्र, मुख्यमंत्र्याच्या सचिवांचा मला मंगळवारी फोन आला. त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या. माझ्या भूमिकेमुळे महायुतीची तसेच मुख्यमंत्र्यांची अडचण होत असून राज्याचं हित आणि मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी माघार घेण्यास संगीतले. त्यानुसार मी माघार घेतली. असे पत्रकार परिषदेत शिवतारे म्हणाले.

पुरंदर तालुक्याचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. त्यांनी अजित पावर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत १० ते १२ दिवसांपासून पवार कुटुंबियांविरोधात मोठा मोर्चा उघडला होता. शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका देखील केली. विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांची डोकेदुखी वाढली होती. त्यांनी याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यावर वर्षा निवासस्थानी दोन दिवसांपुरी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा घडवून मतभेद दूर करण्यात आले. या बैठकीनंतर विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार होते. दरम्यान, आज सासवड येथे बारामती निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे शिवतारे यांनी जाहीर केले आहे.