kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

रोहित पाटलांकडून घरातील नवा गौप्यस्फोट ; उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्ष आरोप काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. आर. आर. आबांनी आपल्या विरोधातील सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर अजित पवारांची खुली चौकशी व्हावी यासाठी सही केली, असा आरोप अजित पवारांनी काल केला. त्यानंतर आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर गंभीर आरोप केले. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला याचे उत्तर योग्य वेळी देऊ, असं म्हणत रोहित पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला हे मला माहीत आहे. योग्यवेळी त्याचं योग्य उत्तर देऊ”, असं रोहित पाटील म्हणाले.

वडील हयात असताना त्यांना मानसिक त्रास काय काय झाला, हे आबा त्यांच्या पुण्यातील मित्रांच्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे. हे मला आबांच्या मित्रांनी सांगितलं आहे. आबांना कोण त्रास द्यायचं याचं उत्तर आपण योग्य वेळी देऊ, असं रोहित पाटील यांनी स्पष्ट केलं. ते तासगावच्या ढवळी येथे प्रचार शुभारंभाच्या सभेमध्ये बोलत होते. अजित पवारांनी तासगावमधून आर. आर. आबांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून रोहित पाटलांनी हा निशाणा साधला.

अजित पवार यांची मंगळवारी (29 ऑक्टोबर) सांगलीच्या तासगाव येथे सभा पार पडली होती. या सभेत त्यांनी आर. आर. पाटील यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आपण आर. आर. आबांना प्रत्येक वेळेला मदत केली. पण आर. आर. आबांनी आपल्याविरोधात उघड चौकशी करावी या फाईलवर स्वाक्षरी केली, असा आरोप अजित पवारांनी केला. “मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणाले, याच्यावर 70 हजार कोटींचा आरोप करुयात. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर ज्यादिवशी आरोप झाला तेव्हापासून महाराष्ट्राची 1 मे 1960 ला निर्मिती होऊन ते आरोपाच्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42 हजार कोटींचा झाला आणि मला 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणाला”, असं अजित पवार म्हणाले.

“खर्च 42 हजार कोटी आणि भ्रष्टाचार 70 हजार कोटींचा? नाही म्हणे आकडा जितका मोठा तेवढं लोकांना वाटत असेल बरका, झालं माझी वाटच लागली. त्यातून एक फाईल निर्माण झाली. ती फाईल गृह खात्याला जाते. त्याने त्या फाईलीवर अजित पवारांची उघड चौकशी करावी म्हणून सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत”, अशी टीका अजित पवारांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. “आर. आर. पाटील नसताना असे विधान करणे चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस आणि मला फाईल दाखवली नाही. चौकशीला घाबरण्याची गरज नाही, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून फाईल दाखवली जाते. बहुतेक त्यांच्यावर 2014 ची टांगती तलवार असावी”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.