राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या मान्यतेने आनंद परांजपे यांना निवडीचे पत्र नुकतेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनांक १८, १९ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणारे नियोजित दोन दिवसीय ‘नवसंकल्प शिबीर’ आता शिर्डी येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये या शिबिराची पूर्ण तयारी करण्यात आली होती मात्र या शिबिराला फ्रंटल व सेल आणि इतर पदाधिकाऱ्यांंनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचा आग्रह धरला त्यांची भूमिका मलाही योग्य वाटली आणि म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासोबत चर्चा करुन संख्या निश्चित केली आहे. पदाधिकाऱ्यांची जास्त संख्या लक्षात घेता छत्रपती संभाजीनगरमध्ये निवासाची व्यवस्था अपुरी पडत असल्याने हे शिबीर शिर्डी येथे घेत असल्याचे सुनिल तटकरे म्हणाल.
या शिबिरात सभासद नोंदणीचा शुभारंभ होणार आहे. शहर, जिल्हा, तालुक्यामध्ये सभासद नोंदणी योग्य पध्दतीने व्हावी यासाठी निरीक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. जेणेकरून विहीत कालावधीत सभासद नोंदणी पूर्ण करण्याचे नियोजन पक्षाचे आहे. या शिबिरात वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांना प्रभावी मांडणी करण्यासाठी निमंत्रित करणार आहोत. या शिबिरामध्ये पक्षाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून दोन दिवसीय नवसंकल्प शिबीरातून नवीन ऊर्जा… नवीन प्रेरणा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी फेब्रुवारीमध्ये पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम संघटनेला दिले जाणार आहेत. त्यातून पक्षाचा प्रभाव व्यापक पध्दतीने राज्यात निर्माण केला जाणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.