पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र पाठवले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पत्रातून आभार मानले आहे. तुमचे सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण जगभरातील मराठी लोकांना खूप भावले, असा उल्लेख देखील या पत्रात शरद पवारांनी केला आहे. तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडलं आहे. दिल्लीत पार पडलेल्या या संमेलनाचे ठिकाण असलेल्या तालकटोरा स्टेडियममधे बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्याचा प्रस्ताव सरहद संस्थेने मांडला आहे. पण अनेक साहित्यिकांची मागणी आहे की पूर्ण आकाराचे घोडेस्वारी पुतळे उभारले जावेत. तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महानगरपालिकाच्या अखत्यारीत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसविण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि NDMC ला निर्देश देण्याबाबत आपण सांगावे, अशी मागणी ही शरद पवार यांनी पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अर्धाकृती पुतळा बसवला जावा, अशी अमित शाह यांना विनंती केली होती. मात्र आता साहित्यिकांची मागणी लक्षात घेता शरद पवारांनी ही यात हस्तक्षेप करत आपली मागणी केली आहे.
सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे नुकतेच 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीत पार पडले आहे. यापूर्वी 1954 साली दिल्लीला 37वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही. मात्र यंदा पार पडलेल्या या साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपदी शरद पवार होते. तब्बल सात दशकांनंतर मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडलंय. शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने पंतप्रधान मोदी यांनी या साहित्य संमेलनाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे पत्रातून आभार मानले आहे.