Breaking News

शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात गुरुवारी (२३ जानेवारी) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर येत आहे. तो निकाल मला पटलेला नाही. त्यानंतर मधल्या काळात अब्दाली येऊन गेले, कोण ते तुम्हाला माहीत आहे. अमित शाह. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला विजय उद्धव ठाकरेंना जागा दाखवणारा आहे. जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय असतो ते तुम्हाला भविष्यात दिसेल”. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेला आता भाजपा नेते प्रत्युत्तर देऊ लागले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं आहे की “तुमचा जन्म व राजकीय कारकीर्द सुरू होण्याआगोदरच्या घटनांवर बोलण्याचं काहीच कारण नाही”.

आशिष शेलार यांनी एक्सवर यासंबंधीची एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “श्रीमान उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० चा आहे. त्यामुळे १९५१ साली स्थापन झालेल्या जन संघाविषयी त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही. ५ आणि ६ एप्रिल १९८० रोजी दिल्लीत जन संघांच्या नेत्यांची बैठक होऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे वय २० वर्षे होते त्यामुळे याबाबत त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही. फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या आणि ‘करगोट्यातून इज्जत निसटण्याच्या वयात’ असतानाच्या काळातील संदर्भ देऊन बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आमचे सांगणे. तुम्ही कुठे जन संघ आणि भाजपाच्या स्थापनेवर बोलता? १०० वर्षे पूर्ण करणाऱ्या संघावर बोलता?”

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

आशिष शेलार उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाचा बहुमान उंचावला आहे. तसेच भाजपा जगात एक नंबरचा पक्ष ज्यांनी करुन दाखवला त्या अमित शाह यांच्यावर बोलता? समाजवाद्यांची पुस्तके वाचून महाराष्ट्र आणि जनसंघाचा इतिहास तुम्हाला कळणार नाही. उद्धव ठाकरे तुम्ही अमित शाह यांच्या पाठीवर वळ उठवणार आहात? कसले? केव्हा? तुमचे वडील म्हणजे अखंड हिदूंचे आशास्थान असलेले हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा २६ जुलैच्या पुरात अडकले होते. तेव्हा तुम्ही मिठी नदीच्या पुराला पाठ दाखवून पंचतारांकित हॉटेलमध्ये पळालात. त्या दुर्दैवी घटनेचे वळ तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल आहेत, ते कधीतरी मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पाहा! कंत्राटदारांकडून कटकमिशन खाऊन मुंबईचा जो बट्ट्याबोळ केलात त्याचे व्रण दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावर आहेत. त्याच्या सुरकुत्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का? हे पण आरशाला विचारुन पहा! मग कळेल जखमा खोल आहेत की तुमच्या मेंदूतच झोल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *