शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील अन्य शहरांबरोबरच पुण्यातूनही त्यांनी अनेक अपेक्षा ठेवल्या असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगतात. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी शहर शिवसेनेच्या मेळाव्याला येण्याचे मान्य केले आहे. त्याप्रमाणे त्यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.३) गणेश कलाक्रिडा मंदिरात शहर शिवसेनेचा मेळावा होत आहे. जिल्ह्यातील गटप्रमुखांनाही मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. उद्धव यांच्याबरोबर माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क नेते आमदार सचिन अहिर व अन्य पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्याकडे मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतूनच शिवसेना विधानसभा लढणार हे नक्की आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ( शऱ्द पवार) यांची शहरात विशेष राजकीय ताकद नाही. शिवसेनेकडे तरूणाईचे जाळे आहे. त्यामुळेच शहरातील कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेट या मतदारसंघांबरोबरच कसबा विधानसभा मतदारसंघाचाही दावा शहरातील शिवसैनिक करणार असल्याची चर्चा आहे.
सुरूवातीला भाजप बरोबर व आता महाविकास आघाडीबरोबर शिवसैनिकांची फरपट सुरू असल्याची खंत अनेक जुन्या शिवसैनिकांना आहे. राजकीय इतिहास बघता दिवंगत काका वडके, नंदू घाटे यांनी शिवसेनेला पुण्यात चळवळीची तर शशिकांत सुतार यांनी राजकीय ओळख मिळवून दिली. सर्वाधिक वेगाने वाढणारे उपनगर हा कोथरूडचा गौरव सुतार यांच्यामुळेच झाला. महापालिकेतील कारकिर्द गाजवल्यानंतर ते शिवाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून २ वेळा निवडून गेले. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत कोथरूडचा पहिला आमदार म्हणून शिवसेनेच्याच चंद्रकांत मोकाटे यांनी संधी मिळाली. दरम्यानच्या काळात दिवंगत विनायक निम्हण यांनी शिवसेनेकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांवर दोन वेळा झेंडा रोवला. कॅन्टोन्मेटमध्येही दिवंगत सूर्यकांत लोणकर आमदार झाले. महापालिकेतही शिवसेनेचे ८ ते १० नगरसेवक निवडून येत.