भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकाला आधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे बारामतीतील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. तरीही कार्यकर्त्यांना आपलाच नेता निवडून येणार असल्याचं वाटत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात पुणे – सातारा महामार्गावर ‘गुलाल आपलाच’ असा आशय लिहिलेले बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा भला मोठा फोटो असून विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं आहे.

पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता.भोर) गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिंदे यांनी चक्क सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर खासदार म्हणून विजयी झाल्याबद्दल त्यांनी सुप्रिया सुळे यांचं अभिनंदनही केलं आहे. “मा. सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.” “गुलाल आपलाच”, “विजय निश्चित”… “कोण म्हणतोय येत नाय, आल्याशिवाय राहत नाय”, या मोठमोठ्या बॅनरवर लावण्यात आला आहे. पुणे-सातारा रस्त्यावरुन प्रवास करताना हे फलक प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. निवडणूक लागली तेव्हापासूनच सुप्रिया सुळे यांचा विजय होणार असल्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विजयाचे फलक लावले आहेत, अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.