राज्याच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहत असतानाच उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांसह तिथे पोहोचले होते. दरम्यान यावेळी लिफ्ट आली असता त्यात भाजपा नेते प्रवीण दरेकरांना पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आधी यांना बाहेर काढा असं म्हटलं. त्यावर प्रवीण दरेकर यांनीही त्यांना उत्तर दिलं. नेमकं काय झालं याबद्दल प्रवीण दरेकर यांनी स्वत:च सांगितलं आहे. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंसह झालेल्या भेटीबद्दल सांगताना प्रवीण दरेकर यांनी राजकारणात आपण कायमचे शत्रू नसतो असं सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “मी लिफ्टमध्ये असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसही आले. मिलिंद नार्वेकरही तिथे होते. त्यावेळी कोणीतरी तुम्ही एकत्रित आहात हे पाहून बरं वाटतं असं सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी याला आधी बाहेर काढा असं सांगितलं. तर मी म्हणालो तुमचं अजून समाधान झालं नाही. माझी बाहेर जायची तयारी आहे, तुम्ही होता का एकत्र. बोलता तसं करा”.
पुढे ते म्हणाले की, “यानंतर हास्यविनोद झाले. आम्ही लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर ते विरोधी आणि आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. त्यांची मानसिकता विरोधी पक्षात राहण्याची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत. आमचे दोन वेगळे मार्ग दिसून आले”.