kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज (२७ सप्टेंबर ) निकाल लागला असून ठाकरे गटाच्या युवा सेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार युवासेनेच्या ७ उमेदवारांचा विजय झाला आहे. ही निवडणूक ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये चुरशीची झाली होती. ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या सात जागांवर विजयी झाल्यामुळे भारतीय विद्यार्थी परिषदेला धक्का बसला आहे. दरम्यान, अजून मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात मतमोजणी सुरू आहे. यंदा १३ हजार ४०६ मतदारांपैकी जवळपास ५५ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानुसार ७ हजार २०० मतांपैकी ६ हजार ६८४ मते वैध आणि ५१६ मते अवैध ठरली आहेत. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना विजयासाठी जवळपास १ हजार ११४ मतांचा कोटा पार करणे आवश्यक आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आवाज कोणाचा शिवसेनेचा – युवा सेनेचा, शिवसेना – युवा सेना जिंदाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू असून पुष्पगुच्छ देण्यासह पेढे वाटले जात आहेत.

नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील ५ जागांसाठी १५, तर प्रत्येकी १ जागा असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातून २, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ३, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून ३, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी ३, महिला प्रवर्गातून २ असे एकूण २८ उमेदवार १० जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राखीव प्रवर्गातून पाचही जागांवर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.

दरम्यान, “शिंदे – भाजप सरकार सुरुवातीपासूनच रडीचा डाव खेळत होते. परंतु तरीही आम्ही सर्व जागांवर विजय संपादन करू,” असा विश्वास युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.