आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपाने विरोधकांना जोरदार धक्कातंत्राचा अनुभव दिला आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपच्या नेत्या आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा भाजपने अखेर पत्ता कट केला. पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या ऐवजी भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पूनम महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकम यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
भाजपने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यातून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून तिकीट देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांचाही एकमेकांशी सामना होणार आहे. या मतदारसंघात प्रथमच प्राध्यापिके विरोधात एका वकिलाची लढत होणार असल्याने या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड आणि उज्जवल निकम यांचा या मतदारसंघाशी संबंध नसतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर केल्याने पूनम महाजन यांचे तिकीट कापले गेले आहे. भाजपाने १५ वी उमेदवार यादी जाहीर केली असून यामध्ये केवळ निकम यांचाच उल्लेख आहे. दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा देणाऱ्या निकमांना भाजपाने उमेदवार घोषित करून वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या मतदारसंघातून मविआने वेळ काढत माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने पूनम महाजन यांना तिकीट देण्याचे टाळले होते. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपाने आपला तगडा उमेदवार जाहीर केला आहे. २०१६ मध्ये निकम यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आता मुंबईतही भाजपाने मविआला कांटे की टक्कर दिली आहे.