विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त आमदारांच्या १२ जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे राज्यातील महायुती सरकारने केली आहे. यामध्ये भाजपाचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. काही वेळापूर्वी या सात जणांचा शपथविधी पार पडला. राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अनेकदा या नियुक्त्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नव्हती. दरम्यान, निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी राज्य सरकारने सात आमदारांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे) मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. मात्र उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही.

विधान परिषदेवरील राज्यपालनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीला कोणत्याही प्रकारची अंतरिम स्थगिती नव्हती किंवा सरकारनेही या नियुक्त्या करणार नाही अशी हमी दिली नव्हती. त्यामुळे, आम्ही १२ पैकी ७ जणांच्या नियुक्त्या केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. न्यायालयाने या प्रकरणी निर्णय राखून ठेवलेला असताना या नियुक्त्या केल्याची बाब ठाकरे गटाच्या याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर राज्य सरकारने उपरोक्त दावा केला आहे.

न्यायालयात नेमकं काय घडलं ?

उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी (याचिकाकर्ते) न्यायालयाला सांगितलं की, न्यायालयाने निर्णय राखून ठेवताना कोणतेही निर्देश दिले नव्हते, अस असताना महायुतीने आमदारांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यावर राज्य सरकारकडून अधिवक्ते म्हणाले, न्यायालयाने आमदारांच्या नियुक्त्या करू नका असं म्हटलं नव्हतं. तसेच आम्ही नियुक्त्या करणार नाही असं सरकारने देखील न्यायालयाला सांगितलं नव्हतं. नियुक्त्या करण्यावर न्यायालयाने देखील अंतरिम स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे महायुतीने या नियुक्त्या केल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारने घाईघाईने निर्णय घेत राज्यपालांकडे शिफारस केली. यामध्ये भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांची नावे देण्यात आली आहेत. शिवसेनेच्या (शिंदे) कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर राष्ट्रवादीकडून (अजित पवार) पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *