रायगड लोकसभा मतदार संघात आज ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि कुटुंबीयांनी रोहा तालुक्यातील दूरटोली, सुतार वाडी येथील आपल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उमेदवार सुनील तटकरे, पत्नी वरदा तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, स्नेहा तटकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी सुनील तटकरे यांनी विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचा विश्वास बोलून दाखवला आहे.

पूर्वी कुलाबा लोकसभा मतदार संघात एकदा शेकाप एकदा काँग्रेस यांचे वर्चस्व होते. त्यावेळी १९९१ च्या निवडणुकीत बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी विजयी होऊन लाटे ची प्रथा मोडून काढली. बाहेर इंडिया आघाडीची लाट असली तरी यावेळी रायगड लोकसभा मतदार संघात लाखाच्या फरकाने मी निवडून येईल असा विश्वास महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी बोलून दाखवला आहे. तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन ही तटकरे यांनी केले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून जनतेला मतदानाचा हक्क दिला आहे. मी ही मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांनीही बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मतदारांना केले आहे. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे शंभर टक्के विजयी होऊन लाखोच्या फरकाने प्रतिस्पर्धी यांचा पराभव करतील असा विश्वास ही अदिती तटकरे यांनी बोलून दाखवला आहे.