Breaking News

संसदेत गदारोळ : अमित शाह माफी मांगो… ‘जयभीम’च्या घोषणांनी संसद दणाणली

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आधी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. अमित शाह माफी मांगोच्या घोषणा दिल्या. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी अमित शाह माफी मांगो आणि जयभीमच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. विरोधकांचा गदरोळ काही थांबत नसल्याने अखेर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यामुळे काँग्रेससह विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी या विधानावरून अमित शाह यांना माफी मागण्याची मागणी केली आहे. आज संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसदेच्या बाहेर हातात डॉ. आंबेडकरांचे फोटो घेऊन जोरदार निदर्शने केली. अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी लावून धरली. त्यानंतर संसदेचं कामकाज सुरू होतात. दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. जयभीमचे नारे देत अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. अखेर या गोंधळातच कामकाकज तहकूब करण्यात आलं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

बाबासाहेब वंदनीय :

विरोधकांनी राज्यसभेतही मोठा गदारोळ केला. यावेळी सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं. बाबासाहेब आमच्यासाठी प्रात: वंदनीय आहेत. सन्माननीय आणि अनुकरणीय आहेत. कॅबिनेटने त्यांना भारतरत्न देण्याचं काम केलं आहे, असं धनखड म्हणाले.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही या निदर्शनात सहभागी :

अमित शाह यांनी आंबेडकरांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही या निदर्शनात सहभागी झाले होते.

ही काय पद्धत आहे, हंडोरे भडकले

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनीही अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. देशाचे गृहमंत्री बोलतात ही काय पद्धत आहे? हे बेजबाबदारपणाच वक्तव्य आहे. हे उचित नाही. आम्हीच नाही, हा संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहोत. बाबासाहेबांचे उपकार आमच्यावर आहेत. अमित शाह यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी माफी मागावी अशी मागणी आमची आहे. बाबासाहेबांच्या घटनेमुळे देश द्वीपस्तंभाप्रमाणे चालत आहे, असं काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांनी श्रद्धा दाखवली

संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी अमित शाह यांनी आंबेडकरांचा अपमान केल्याच्या वृत्तास नकार दिला आहे. “आम्ही अमित शाह यांचं वक्तव्य नीट ऐकलं आहे. त्यांनी बाबासाहेबांप्रती श्रद्धेचा भावच व्यक्त केला आहे. काँग्रेसने कशापद्धतीने बाबासाहेबांचा अपमान केला आणि त्यांना भारतरत्न दिला नाही हेच त्यांनी सांगितलं. काँग्रेसने बाबासाहेबांना कसा त्रास दिला हेच अमित शाह यांनी सांगितलं. काँग्रेसनेच बाबासाहेबांचा वारंवार अपमान केला आहे. बाबासाहेब बौद्ध होते. मीही बौद्ध आहे. आम्ही त्यांच्या मार्गावरच चाललो आहोत. तुम्ही त्यांच्या मार्गावर चालत नाहीत. तुम्ही ढोंगी आहात,” अशी टीका किरेन रिजिजू यांनी केली आहे.

काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला

विधीमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनीही विरोधकांवर हल्ला चढवला. विरोधकांनी तर संसदेत बाबासाहेबांचा फोटो सुद्धा लावू दिला नव्हता. आज मात्र त्यांचे फोटो घेऊन आले आहेत. काँग्रेसने नेहमीच बाबासाहेबांचा अपमान केला आहे. काँग्रेसने तर बाबासाहेबांना संसदेतही पोहोचू दिलं नव्हतं, असा हल्लाच मेघवाल यांनी चढवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *