पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचा भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. यामुळे देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी तब्बल 76000 कोटी खर्च करण्यात येणार आहे. या कार्यक्रमावेळी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकासआघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला. “महाराष्ट्राचा विकास हे माझं प्राधान्य आहे. आज मेक इन इंडियाचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. मात्र त्या अडीच वर्षात या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“पालघरमधील वाढवण बंदरापासून दिल्लीचा महामार्ग जवळ आहे. वर्षभर इथून कार्गो येईल आणि जाईल. त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. राज्यातील बहीण भावांना मिळेल. नव्या पिढीला मिळेल. महाराष्ट्राचा विकास हे माझं प्राधान्य आहे. आज मेकिंग इंडियाचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. आज आत्मनिर्भर अभियानाचा लाभ महाराष्ट्राला होत आहे. आज भारताच्या प्रगतीत महाराष्ट्र मोठी भूमिका निभावत आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

महाराष्ट्र विरोधी दलाने तुमच्या विकासावर तुमच्या भल्यावर नेहमी ब्रेक लावण्याचं काम केलं. मी आज तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्या देशाला मोठ्या पोर्टची गरज होती. पालघरच त्यासाठी उपयुक्त जागा आहे. हा पोर्ट प्रत्येक हवामानात काम करू शकतो. पण ६० वर्ष हा प्रोजेक्ट लटकवला गेला. काही लोक सुरुच करत नव्हते. २०१४ मध्ये तुम्ही आम्हाला दिल्लीत पाठवलं. २०१६ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. तेव्हा त्यांनी गंभीरपणे काम सुरू केलं. २०२०मध्ये बंदर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सरकार बदललं. त्यानंतर अडीच वर्ष या ठिकाणी कोणतंही काम झालं नाही, असा थेट आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

एकट्या या प्रकल्पाने या ठिकाणी अनेक लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे. १२ लाख रोजगार येणार आहे. या विकासाला कुणाचा विरोध होता. महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावणारे हे कोण लोक होते? राज्यातील तरुणांना रोजगार मिळण्यास कुणाचा आक्षेप होता? आधीच्या सरकारने हे काम पुढे का नाही नेलं? ही गोष्ट राज्यातील लोकांनी कधीच विसरू नये. खरं तर काही लोकांना महाराष्ट्राला मागास ठेवायचं आहे. पण आमची महायुतीचं सरकार राज्याला देशात सर्वात पुढे न्यायचं आहे, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.