२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे विधानसभेत त्यांची कामगिरी करुन आपण किती धडाडीचे नेते आहोत हे दाखवून दिलं होतं. तसंच अनेक घोटाळे बाहेर काढले होते. विधानसभेत सद्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले होते. तर भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी विधानसभेच्या बाहेरची खिंड लढवली होती. प्रसंगी हातोडा घेऊनही ते बाहेर पडल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आहे. अशात हे सगळं का केलं याबाबतची माहिती स्वतः किरीट सोमय्यांनीच दिली आहे.
भाजपाचे नेते किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते, त्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. किरिट सोमय्या यांनी यामागचं कारण आता सांगितलं आहे. विरोधी पक्षातल्या लोकांना ठाकरे सरकारने तुरुंगात धाडलं असतं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
“मातोश्रीचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश मला दिल्लीतून आले होते. तसंच देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांना पक्षानेच तो आदेश दिला होता.” असंही किरीट सोमय्या म्हणाले. मुंबई तकच्या चावडी या कार्यक्रमात किरीट सोमय्या आले होते. तिथे त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
“ठाकरे सरकारमधल्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणं ही त्यावेळची गरज होती. तसं केलं नसतं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजपा संपवली असती, विरोधकांना संपवलं असतं, तुरुंगात टाकलं असतं.” असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. पुढे किरीट सोमय्या असं म्हणाले की, “आम्ही कोणत्याही नेत्यामागची केस मागे घेतलेली नाही. त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. भ्रष्टाचार सुरु झाला तर किरीट सोमय्या पुन्हा आवाज उठवणार” असंही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं आहे.
“वाशिममध्ये भावना गवळीच्या मतदार संघात गावातल्या एका रस्त्यात लोकांनी मला घेराव केला होता. दगडफेक केली. जेम तेम वाचलो होतो. या घटनेच्या 10 मिनिटानंतर अमित शाह यांचा फोन आला आणि विचारणा झाली कुठे लागलं का? आणि दुसऱ्या दिवशी मला झेड सिक्युरीटी मिळाली. पक्षाने मला ही सिक्युरीटी देऊन माझ्या कामाची पोचपावती दिली होती”, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.