kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

वरळी विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होणार का?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. आता राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक, जागावाटप आणि मतदारसंघांबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी उद्या सकाळी 9 वाजता एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला पक्षातील महत्त्वाचे नेते, सरचिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा होणार आहे. तसेच याच बैठकीत राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उमेदवारीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. आता यावर अमित ठाकरे यांनी स्वत: भाष्य केले आहे. “मी कुठून ही आणि कोणाबरोबर ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यास तयार आहे. वरळी हा विषय आमच्या पक्षाच्या बैठकीतील विषय होता. तो कसा बाहेर आला, याची मला माहिती नाही. माझा पक्ष मला जिथून लढण्यास सांगेन आणि ज्याच्या विरोधात लढण्यास सांगेन, तेथून मी लढण्यास तयार आहे. तसेच पक्षाला जेथे माझी गरज असेल तेथून मी विधानसभा लढवण्यास तयार आहे”, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होणार का? याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.