Breaking News

हिवाळी अधिवेशन! विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, ‘ही’ दिली कारणं

महायुती सरकारे हिवाळी अधिवेश नागपूरात सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने विरोधकांसाठी चहापानाचे आयोजन केले होते. मात्र विरोधकांनी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला आयोजित केलेल्या या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. राज्य कर्जबाजारी झाले आहे. उद्योग गुजरातला चालले आहेत. बीडमध्ये सरपंचाचा खून होतो. असे आरोप करत विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले उपस्थित होते.

हे सरकार खुनी सरकार आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा प्रश्नही त्यांनी केला आहे. हे सरकार दलित विरोधी आहे. बीडमध्ये सरपंचाचा खून केला जातो. खून करणारा व्यक्ती कोण आहे? त्याचा कोणाशी संबध आहे? त्याच व्यक्तीला मंत्रिमंडळात शपथ दिली जाणार आहे. याचा आम्ही निषेध करतो असंही दानवे म्हणाले. मुख्यमंत्री मात्र मिरवणुकीत व्यस्त आहेत असंही ते म्हणाले. हे अधिवेनश फक्त दिखावा आहे. ना प्रश्न आहेत ना उत्तर आहेत. असं असलं तरी या सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत असंही ते म्हणाले. शेतकरी हैराण आहे. शेतमालाला भाव नाही. अशा स्थिती या सरकारचा चहा पिण्यात अर्थ नाही. त्यामुळे बहिष्कार टाकत असल्याचे ते म्हणाले.

या वेळी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सर्वात कमी दिवसांचे हे अधिवेशन आहे असं ते म्हणाले. विदर्भातील मुख्यमंत्री असताना हे अधिवेशन किमान तीन आठवड्यांचे अपेक्षित होते. त्यात विदर्भात अनेक प्रश्नांची चर्चा करता आली असती. पण त्याला हरताळ फासण्याचे काम या सरकारने केले आहे. महाराष्ट्रात सोयाबीन शेतकरी रडत आहे. उद्योग बाहेर जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. एका सरपंचाला उचलून नेलं जातं. त्याचा खून केला जातो. या खूनात ज्या व्यक्तीचा संबध आहे तो कोणाचा माणूस आहे असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. खून करणाऱ्यांना राजकीय आश्रय दिला जात आहे असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेसही या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे ते म्हणाले.

तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला इशारा दिला आहे. आमची संख्या कमी आहे. पण ती महत्वाची नाही. जरी संख्येने आम्ही कमी असलो तरी या पाशवी बहुमता विरोधात आम्ही लढणार असल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं. आम्ही ईव्हीएम विरोधात आवाज उठवणार आहोत. त्याच बरोबर त्यांनी बीड इथं झालेल्या सरपंचाच्या खूनाचा प्रश्नही उपस्थित केला आहे. दरम्यान या सरकारला या अधिवेशनात आपण धारेवर धरू असंही आव्हाड यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी ही एक आहे. सभागृहातही आपण एकत्र सरकारला टक्कर देवू असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *