नागपूर शहरातील सीए रोड परिसरात मोठ्या प्रमाणात जिवंत विस्फोटक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दोसर भवन चौकात, मेट्रो स्टेशनच्या अगदी शेजारी आणि अत्यंत संवेदनशील भागात ही घटना उघडकीस आली. आज सकाळी एका घराच्या परिसरात संशयास्पद बॅग असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बॅगमध्ये तब्बल १५ जिलेटीन कांड्या, ५८ डिटोनेटर आणि ८ कनेक्टर आढळून आले. ही बॅग गेल्या एक ते दीड महिन्यांपासून त्या ठिकाणी पडून असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. आज सकाळी त्या बॅगमधील जिलेटीन कांड्या बाहेर दिसू लागल्यामुळे घरमालकाच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिसर सील करून शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान सर्व विस्फोटक साहित्य सुरक्षितपणे जप्त करण्यात आले असून ते पुढील तपासासाठी अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा साठा आढळला तो परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. घटनास्थळापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर जामा मशिद, ५०० मीटरवर पोद्दारेश्वर राम मंदिर आणि दीड ते दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटाशी या विस्फोटकांचा संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित कंपनीतील स्फोटक साहित्य बेवारस अवस्थेत येथे आणून टाकण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.














