kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शिवजयंती २०२६ : शिवनेरीवर गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी होऊन आठ जण जखमी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी गडावर शिवजयंतीच्या उत्सवात मोठी दुर्घटना घडली. शिवजन्मोत्सवाचा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त गडावर दाखल झाले होते, पण वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने अंबरखाण्याच्या परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिक जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवनेरीवर गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी होऊन आठ जण जखमी झाले. जखमींना पहाटे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर चंदनापुरी आणि मंचर येथील दोघांना दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश आगम यांनी दिली.

शिवनेरी गडावर नेमकं काय घडलं?

शिवजयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवनेरीवर शिवज्योत घेऊन येणारे तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच शिवजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. मध्यरात्रीपासूनच गडाच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. पण वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली. अंबरखाण्याच्या खालील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यासारख्या अरुंद मार्गांवर एकाच वेळी मोठ्या संख्येने शिवभक्त जमल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.