पश्चिम आशियातील संघर्षाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भीषण होत चालली असून त्याचा थेट फटका भारतीय नागरिकांना बसत आहे. सोमवारी पहाटे कुवेतमध्ये एका ऊर्जा आणि जल शुद्धिकरण प्रकल्पावर इराणने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला. या ताज्या घटनेमुळे या युद्धात जीव गमावलेल्या भारतीय नागरिकांची एकूण संख्या आता आठ झाली आहे.
कुवेतच्या ऊर्जा आणि जल मंत्रालयाने ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, इराणी हल्ल्यात प्रकल्पातील इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, याला “पापी इराणी आक्रमण” असे संबोधले आहे. तांत्रिक आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली असून, पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुवेतच्या वीज, पाणी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रवक्त्या इंजिनिअर फातिमा अब्बास जोहर हयात यांनी एका निवेदनाद्वारे या हल्ल्याची पुष्टी केली.
सद्यस्थितीत तांत्रिक आणि मदत पथकांकडून तात्काळ काम सुरू झाले आहे. प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यात आला असून या घटनेमुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














