बिग बॉस मराठी 6 च्या भव्य महाअंतिम सोहळ्यात ‘राजा शिवाजी’ या बहुचर्चित चित्रपटाची विशेष झलक पाहायला मिळाली. या वेळी अभिनेते रितेश देशमुख , अभिषेक बच्चन आणि जिनिलिया देशमुख यांनी हजेरी लावत कार्यक्रमाची रंगत वाढवली. या चित्रपटाच्या टीमने बिग बॉसच्या मंचावर केवळ संवादच साधला नाही, तर फिनालेमध्ये प्रेक्षकांचा उत्साहही दुप्पट केला. या भव्य सादरीकरणामुळे ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक महाकाव्य आहे. या चित्रपटाचे लेखक आणि निर्माते रितेश देशमुख असून त्यांनीच यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते यांसारख्या दिग्गज कलाकारांची फळी आहे. चित्रपटातील ‘छत्रपती’ हे गाणे संगीतकार अजय-अतुल यांनी साकारले असून त्याच्या झलकांनी प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. पोस्टर्स, टीझर आणि बीटीएस दृश्यांमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी मराठी आणि हिंदी भाषेत जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय इतिहास भव्य पद्धतीने पडद्यावर आणणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.














