‘कॉकटेल 2’बद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा उत्साह कायम ठेवण्यासाठी, निर्मात्यांनी आज, 2 जून रोजी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला, ज्यामुळं चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल आणखी उत्सुकता वाढली आहे. कॉमेडी, रोमांच आणि भावनिक वळणांची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. होमी अदजानिया दिग्दर्शित या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात शाहिद कपूर, क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा लोकप्रिय ‘कॉकटेल’ मालिकेचा सीक्वेल आहे. चित्रपटाच्या थिएटरमधील प्रदर्शनाला फक्त दोन आठवडे शिल्लक असताना, निर्मात्यांनी भव्य लाँच इव्हेंटमध्ये ‘कॉकटेल 2’चा ट्रेलर प्रदर्शित करून शाहिदच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे.
निर्मात्यांनी हा ट्रेलर यूट्यूबवर अपलोड केला आहे. 3 मिनिटे 1 सेकंदाचा हा ट्रेलर प्रेम, मैत्री आणि लग्नाच्या कथेची एक झलक दाखवतो. ट्रेलरची सुरुवात शाहिद कपूरच्या व्हॉईसओव्हरनं होते, जो म्हणतो, “जेव्हा एखादे नाते नवीन असते, तेव्हा ते नवीन असल्यामुळं रोमांचक वाटतं. नवीन मित्र मजेशीर असतात, कारण त्यांच्या गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात. जुन्या मित्रांकडून त्याच त्याच गोष्टी ऐकून आपण कंटाळतो, ते एका फाटलेल्या टी-शर्टसारखे आहे, जो आपण रोज रात्री घालून झोपतो. पण जेव्हा प्रेमाचे रूपांतर मैत्रीत होते आणि मैत्रीला प्रेमाची किनार लागते, तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग उरतो. आपल्याला ट्रेलरमध्ये शाहिद कपूर, क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदान्ना यांची झलक दाखवली जाते. त्यानंतर प्रेक्षकांना कुणाल (शाहिद), दिया (रश्मिका) आणि एली (क्रिती) यांची ओळख करून दिली जाते. त्यांच्या सुट्टीदरम्यान, कुणाल आणि दिया यांची भेट मनमोकळ्या स्वभावाच्या एलीशी होते आणि त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळते. त्यांची मैत्री एका प्रेम त्रिकोणात बदलू लागताच, खूप गोंधळ आणि अशांतता निर्माण होते.
हा रोमांचक आणि रंगीबेरंगी ट्रेलर प्रेक्षकांना विविध आकर्षक ठिकाणी घेऊन जातो, जिथे ही तिघेही पार्ट्या, साहस आणि आयुष्याचा पुरेपूर आनंद घेताना दिसतात. कुणाल आणि दिया एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत आणि त्यांचे लग्न होणार असे दिसते, तर एली त्यांच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे. यानंतर दिया आणि एली यांच्यात गैरसमज होते, ज्याचा फटका कुणालला बसतो, तेव्हा कथेला एक नाट्यमय वळण मिळते. हा ट्रेलर रहस्य, विनोद आणि भावनिक चढ-उतारांनी भरलेल्या एका आकर्षक कथेची झलक देतो. होमी अदजानिया दिग्दर्शित आणि दिनेश विजन, लव रंजन, प्रमिता आर. विजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘कॉकटेल 2’, हा चित्रपट तरुण जैन आणि लव रंजन यांनी लिहिला आहे. 19 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा या चित्रपटात प्रेक्षकांना मैत्री, प्रेम आणि संघर्षाचे मिश्रण पाहायला मिळेल.
















Leave a Reply