शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर आहेत. मात्र या दोघांच्या नावावर शिंदेंचे मंत्री आणि नेत्यांनीच विरोध दर्शवला आहे. राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी, असा अनेकांचा सूर आहे. तसेच बच्चू कडू यांचा शिवसेनेशी काय संबंध? असाही पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. उमेदवारी द्यायची झाल्यास बच्चू कडू यांच्यासमोर शिवसेनेने एक अट ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रहार संघटना ही शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्तावही शिवसेनेकडून बच्चू कडू यांना दिल्याचे कळते.
बच्चू कडू यांनी 23 एप्रिल रोजी एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. बच्चू कडूंच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडूनच विलिनीकरणाची अट ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रहार जनशक्ती पक्षाची बच्चू कडूंकडून 1999 ला स्थापना करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी बच्चू कडूंनी साथ दिली होती. मात्र 2024 च्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2024 ला प्रहार जनशक्तीने 38 जागा लढवल्या होत्या. पण सर्व जागी पराभूत त्यांचे उमेदवार पराभूत झाले. 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्तीला 1.55 टक्के म्हणजेच 3.07 लाख मतं मिळाली होती. आता बच्चू कडू शिवसेनेने घातलेली अट मान्य करुन विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही?, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी दोनवेळा मतदान करावं लागणार आहे. 9 जागांसाठी एकदा मतदान होणार तर प्रज्ञा सातव यांची रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान होईल. दोन्ही मतदान जरी एका दिवशी होणार असलं, तरी आमदारांना दोन वेळा मतदान करावं लागणार आहे. 9 जागांसाठी 29 चा कोटा असणार आहे. तर एका जागेसाठी 51 टक्के मतांची मर्यादा असणार आहे. या समीकरणामुळे 10 पैकी 9 जागा सहज महायुतीला जिंकता येणार तर महाविकास आघाडीला 1 जागेवर समाधान मानावं आहे.
विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार-
उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)
विधान परिषदेची पोटनिवडणूक-
प्रज्ञा सातव
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम-
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026











