मुंबईनजीकच्या मीरा रोड परिसरात रविवारी पहाटे एका माथेफिरूने दोन सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. धर्माची विचारपूस करून कलमा वाचता येतो का? असा सवाल करत आरोपीने सुरक्षा रक्षकांवर हल्ला चढवला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आणि आरोपीच्या हालचाली लक्षात घेता, आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४ च्या सुमारास मीरा रोड पूर्व येथील नया नगर भागात एका निर्माणाधीन इमारतीवर राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन हे दोन सुरक्षा रक्षक कर्तव्यावर होते. यावेळी आरोपी जुबैर अंसारी (३१) तिथे आला. त्याने दोन्ही रक्षकांना त्यांची नावे आणि धर्म विचारला. त्यानंतर त्याने त्यांना कलमा वाचता येतो का? अशी विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी नकार देताच, अंसारीने खिशातील चाकू काढून त्यांच्यावर सपासप वार केले.
या हल्ल्यात राजकुमार मिश्रा यांच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुब्रतो सेन यांनी सुरक्षा केबिनमध्ये लपून आपला जीव वाचवला आणि पोलिसांना माहिती दिली.
नया नगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या दीड तासात जुबैर अंसारीला त्याच्या भाड्याच्या घरातून अटक केली. मात्र, तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपीकडे सापडलेल्या एका चिठ्ठीत ‘LONE WOLVES WILL POUNCE ON YOU’ आणि हिंदुस्थानातील खऱ्या जिहादची भाषा वापरण्यात आली आहे. तसेच यात गाझा आणि जिहाद या शब्दांचाही उल्लेख आहे. तपासानुसार, अंसारी सातत्याने इंटरनेटवर आयएसआयएसशी संबंधित कट्टरपंथी व्हिडिओ पाहत असे. आरोपी उच्चशिक्षित असून त्याने २०१९ पर्यंत अमेरिकेत शिक्षण घेतले आहे. तो एका कोचिंग सेंटरमध्ये गणित आणि रसायनशास्त्र शिकवत असे.
हा हल्ला पूर्व नियोजित होता की रागाच्या भरात केला गेला, याचा शोध घेतला जात आहे. आरोपीचा मोबाईल, ब्राउझिंग हिस्ट्री आणि तो कोणाच्या संपर्कात होता का, याची कसून चौकशी केली जात आहे. एकट्यानेच कट रचून हल्ला करण्याच्या पद्धतीला लोन वुल्फ अटॅकशी हा प्रकार मिळताजुळता असल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
या घटनेनंतर परिसरात अफवा पसरू नये म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी माहिती किंवा मेसेज सोशल मीडियावर पसरवल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.













Leave a Reply