देशात वाढत्या इंधन दरांचा आणि महागाईचा फटका बसत असताना, दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘इंधन बचती’च्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. या आवाहनापासून प्रेरित होऊन अमृता फडणवीस यांनी आपल्या दैनंदिन जीवनात मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणला आहे. घरापासून 5 ते 7 किलोमीटरच्या परिघातील सर्व कामांसाठी त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बाजूला ठेवून थेट सायकलचा वापर सुरू केला आहे.
इराण-अमेरिका आखाती तणावामुळं सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत राष्ट्रीय संपत्ती असलेल्या इंधनाची बचत करण्यासाठी उचललेले हे वैयक्तिक पाऊल अत्यंत दिशादर्शक ठरत आहे. “पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्याच्या दिशेनं हे माझं एक छोटेसं पाऊल आहे. मात्र, यामुळं पैशांची आणि इंधनाची बचत तर होतेच, पण त्यासोबतच मी एका अधिक निरोगी जीवनशैलीचाही स्वीकार केला आहे,” अशा भावना अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.
अनेकदा देशात किंवा समाजात मोठे आणि अर्थपूर्ण बदल घडवण्यासाठी मोठ्या क्रांतीची गरज नसते. तर आपल्या रोजच्या साध्या-सोप्या निवडींमधूनच त्याची सुरुवात होत असते. हेच या उदाहरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. केवळ 5 किलोमीटरच्या प्रवासासाठी बाईक किंवा कार न वापरता सायकल चालवल्यास दरमहा शेकडो लिटर इंधनाची बचत होऊ शकते. तसंच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते. या अनोख्या उपक्रमामुळं आजूबाजूच्या परिसरात त्यांचे कौतुक होत असून, इतरांनाही यातून सायकल चालवण्याची प्रेरणा मिळत आहे.












Leave a Reply