उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल लागलेली असतानाच पुणेकरांवर पाणी कपातीचे मोठे संकट कोसळले आहे. पुणे महापालिकेनं याबाबतची घोषणा नुकतीच केली आहे. या घोषणनेनंतर पुणेकर संतप्त झाले आहेत. शहरातील पाणी कमी करून ते शेतीसाठी सोडले जात असल्याचा गंभीर आरोप शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. राजकीय दबावापोटी नागरिकांच्या हक्काच्या पाण्याचा बळी दिला जातोय का, असा संतप्त सवाल त्यांनी विचारलाय.
पुणे महापालिकेने शहरात येत्या 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सजग नागरिक मंचाचे सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धरणांमध्ये तब्बल 20 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाणीटंचाईच्या खाईत का लोटले, असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.
सध्याच्या घडीला खडकवासला धरण प्रकल्पात एकूण 4.95 टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराच्या रोजच्या गरजेचा विचार केला, तर आगामी 31 जुलैपर्यंत पुणेकरांना केवळ 2.65 टीएमसी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. यामध्ये आगामी काळात येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी लागणारे 0.5 टीएमसी पाणी वेगळे काढून ठेवले, तरीही धरणांमध्ये 20 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका साठा शिल्लक राहतो. असे असताना जलसंपदा विभागाने सुचवलेल्या केवळ 15 टक्के कपातीचा आधार घेत महापालिकेने थेट 40 ते 50 टक्के पाणी कपात का लादली, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
टँकर लॉबीचा फायदा होणार??
महापालिकेच्या या नव्या निर्णयामुळे एका दिवसाआड अर्धे शहर पूर्णपणे कोरडे राहणार आहे. महापालिकेची पाणी वितरण व्यवस्था आधीच ढिसाळ असल्याने या निर्णयामुळे नागरिकांची डोकेदुखी प्रचंड वाढणार आहे. यापूर्वी मे महिन्यात जेव्हा अशाच प्रकारे पाणीबंदी करण्यात आली होती, तेव्हा अनेक भागांत सलग दोन ते तीन दिवस पाणीच पोहोचले नव्हते.
आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार असून शहरात काही भागांत सलग दोन दिवस पाणी न मिळाल्यास हाहाकार माजण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोंधळात शहरातील टँकर लॉबी पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे असून टँकरचे दर गगनाला भिडण्याची भीती वर्तवली जात आहे.















Leave a Reply