कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी देशातील विविध ठिकाणी विद्यार्थी आणि आंदोलकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेताना सरकारने दिलेली आश्वासनं 28 जुलैपर्यंत लेखी देण्याच्या वचनाची आठवणही करून दिली. सरकारने ताब्यात घेतलेल्या किंवा अटक केलेल्या विद्यार्थी आणि आंदोलकांची त्वरित सुटका करावी आणि सर्व एफआयआर त्वरित मागे घ्याव्यात. अन्यथा, आम्ही पुढील आवश्यक पावले उचलू, असा इशाराही दास यांनी दिला आहे.
कॉक्रोच जनता पार्टीनं नेमकं काय म्हटलं?
“आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये विविध सरकारी यंत्रणांकडून विद्यार्थी आणि इतर आंदोलकांना लक्ष्य केले जात आहे, त्यांना ताब्यात घेतले जात आहे किंवा अटक केली जात असल्याच्या अनेक बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. याबद्दल आम्हाला तीव्र चिंता वाटत आहे.”
“‘कॉकरोच जनता पार्टी’ने आपले देशव्यापी आंदोलन तेव्हाच मागे घेतले होते, जेव्हा भारत सरकारने आम्हाला आश्वासन दिले होते की, भाजपा किंवा एनडीएशासित कोणत्याही राज्यात कोणत्याही आंदोलकावर आता किंवा भविष्यात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे या राज्यांमधून समोर येणाऱ्या बातम्या अत्यंत चिंताजनक आहे”, असं मत सौरव दाने व्यक्त केलं.
“प्रथम आम्ही प्रत्येक आंदोलकाला सांगू इच्छितो की, आमची कायदेशीर टीम संबंधित राज्यांमधील तज्ज्ञ वकिलांशी समन्वय साधून ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी आणि सर्व प्रकारची कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे काम पहिल्या दिवसापासूनच सुरू आहे.”
“दुसरे म्हणजे आम्ही भारत सरकारला विशेषतः जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांना आवाहन करतो की, त्यांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करावी. यासाठी त्यांनी ताब्यात घेतलेल्यांची सुटका करावी आणि देशात कोठेही कोणत्याही आंदोलकावर कोणतीही बळजबरीची किंवा सूडबुद्धीची कारवाई केली जाणार नाही, असे निर्देश द्यावेत. तसेच, दाखल केलेले एफआयआर देखील मागे घेतल्या जाव्यात”, अशी मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात दास यांनी सरकारला 28 जुलैपर्यंत लेखी हमी देण्याच्या त्यांच्या वचनाचीही आठवण करून दिली.
“देशव्यापी आंदोलन स्थगित करण्याचा आमचा निर्णय सद्भावनेने आणि केवळ सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवूनच घेण्यात आला होता. त्या आश्वासनापासून माघार घेणे म्हणजे केवळ ‘कॉकरोच जनता पार्टी’चा विश्वासघात ठरणार नाही, तर संवादाचा मार्ग निवडणाऱ्या लाखो तरुण भारतीयांचाही विश्वासघात ठरेल. असा विश्वासघात तरुणांना अजिबात मान्य होणार नाही.”
“भारत सरकारला हे लक्षात आणून दिले जात आहे की, केवळ आश्वासन देऊन नव्हे, तर दिलेले आश्वासन पाळूनच सरकारची विश्वासार्हता सिद्ध होते.”
“तरुण आंदोलकांना आम्ही संयम ठेवण्याचं आवाहन करतो. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. सीजेपी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि भारत सरकार तसेच भाजपा/एनडीए शासित सर्व राज्य सरकारांकडून अपेक्षा करते की, सध्याच्या परिस्थितीची गरज लक्षात घेऊन त्यांनी अत्यंत तातडीने, जबाबदारीने आणि सद्भावनेने कृती करावी,” असं आवाहन दास यांनी केलं.
“ताब्यात घेतलेल्या किंवा अटक केलेल्या सर्वांची त्वरित आणि कोणत्याही परिस्थितीत उद्यापर्यंत (28 जुलैपर्यंत) सुटका केली जावी आणि सर्व एफआयआर त्वरित मागे घेतले जावेत; अन्यथा, आम्ही पुढील आवश्यक पावले उचलू”, असा इशाराही दासनी दिला.












Leave a Reply