चार वर्षांची ‘ऑनर्स’ पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता एका वर्षात ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षणातून पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या संदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा अधिक लवचीक पर्याय उपलब्ध होणार आहे.
‘यूजीसी’च्या या निर्णयामुळे चार वर्षांच्या ‘ऑनर्स’ पदवीधारक विद्यार्थ्यांना नियमित दोन वर्षांचा कालावधी खर्च न करता एका वर्षात पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि लवचीक पद्धतीने शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लाभदायी ठरणार असून, ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षणालाही त्यामुळे अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
‘या अभ्यासक्रमासाठी केवळ चार वर्षांची ‘ऑनर्स’ पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा सर्व सत्रांमधील सीजीपीए ७.५; तसेच एमबीए, एमसीए आणि पीजीडीएमसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संबंधित नियामक संस्थांनी निश्चित केलेले प्रवेश नियमच लागू राहतील,’ असे ‘यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.
‘यूजीसी’ने याआधी याबाबत दिलेले निर्देश रद्द करून नवे निर्देश दिले. त्यानुसार, ज्या उच्च शिक्षण संस्थांना आधीपासून दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम मुक्त व दूरस्थ शिक्षण (ओडीएल) किंवा ऑनलाइन माध्यमातून चालवण्याची मान्यता आहे त्याच संस्थांना संबंधित विषयात एका वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही नव्या संस्थेला स्वतंत्रपणे ही सुविधा उपलब्ध होणार नसून, केवळ पात्र संस्थांनाच हा अभ्यासक्रम सुरू करता येईल.
अभ्यासक्रमाची रचना, अभ्यास साहित्य, अध्यापन पद्धती, मूल्यमापन, क्रेडिट प्रणाली आणि इतर सर्व शैक्षणिक बाबी ‘यूजीसी’च्या विद्यमान नियमांनुसार असणे बंधनकारक राहील; तसेच अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी संबंधित विद्यापीठाचे अभ्यास मंडळ, शैक्षणिक परिषद आणि कार्यकारी परिषद किंवा समकक्ष वैधानिक संस्थेची मंजुरी घेणे आवश्यक असेल.














Leave a Reply