मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेची बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आगामी गणेशोत्सवात मूर्तींचे सुरक्षित आगमन आणि विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी बीएमसी प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता एक टनापेक्षा जास्त वजन असलेल्या मोठ्या गणेशमूर्तीसाठी ‘योग्यता प्रमाणपत्र’ म्हणजेच ‘फिटनेस सर्टिफिकेट’ अनिवार्य करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. या नवीन नियमांमुळे मोठ्या आणि वजनदार गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांचा धोका टाळता येणार आहे.
बीएमसी प्रशासनाने जड आणि मोठ्या मूर्तींच्या सुरक्षेसाठी विशेष कार्यप्रणाली तयार केली आहे. त्यामध्ये गणेश मंडळांनी मूर्तीची ऑर्डर दिल्यापासून ती तयार होऊन मंडपात येईपर्यंतची संपूर्ण माहिती बीएमसीकडे नोंदवली जाणार आहे. जड मूर्तींच्या वाहतुकीदरम्यान कोणताही अपघात होऊ नये, यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गावर बीएमसीचे पथक विशेष देखरेख ठेवणार आहे.
यासंदर्भात सर्वसमावेशक नियमावली (SOP) तयार करण्यासाठी डीएमसी (झोन 2) अधिकारी प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मूर्तींची सुरक्षा, फिटनेस प्रमाणपत्रे आणि वाहतुकीच्या नियमांना अंतिम रूप देण्यात आले.
दुसरीकडे, गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्तांना आणि आगमन मिरवणुकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कडक पावले उचलली आहेत. गणेशमूर्तींच्या आगमन आणि विसर्जनासाठी वापरले जाणारे सर्व प्रमुख रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी रस्ते विभाग आणि सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.













Leave a Reply