राजकारणात दररोज आरोप-प्रत्यारोप, टीका आणि राजकीय भेटीगाठी सुरू असतात. मात्र, रक्षाबंधनाच्या निमित्तानं राजकीय नेत्यांच्या घरातील वातावरण काहीसे वेगळं पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी आज बहीण-भावाच्या नात्याचा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ठाकरे कुटुंबापासून मुंडे भावंडांपर्यंत तसेच प्रसाद लाड, चित्रा वाघ आणि आशिष शेलार यांच्यासह अनेक राजकीय नेते आज शुक्रवारी (28 ऑगस्ट) राजकारण बाजूला ठेवून कौटुंबिक भूमिकेत दिसले. रक्षाबंधनानिमित्त बहिणींनी भावांच्या मनगटावर राखी बांधत प्रेम आणि आपुलकीचं नातं जपलं.
ठाकरे कुटुंबात रक्षाबंधनाचा उत्साह :

ठाकरे कुटुंबात यंदाचं रक्षाबंधन खास ठरलं. शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या बहिणी जयवंती ठाकरे यांनी त्यांना राखी बांधली. राज ठाकरे यांचे मित्र नयन शाह यांच्या पत्नी हेतल शाह यांनीही त्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केलं. अमित ठाकरे आणि त्यांची बहीण उर्वशी ठाकरे यांनीही रक्षाबंधन साजरे केले. उर्वशी यांनी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनाही राखी बांधली. कुंदा ठाकरे आणि चंदुमामा वैद्य यांनीही रक्षाबंधन साजरे केले.
ठाकरे कुटुंबातील रक्षाबंधनासोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्तुळातही रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. यामुळे उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यातील स्नेहबंध पुन्हा चर्चेत आला.
चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना राखी बांधली :

भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यासाठीही रक्षाबंधनाचा दिवस खास ठरला. चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना राखी बांधली. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही त्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. राजकारणात एकत्र काम करणाऱ्या या नेत्यांमधील स्नेहाचा धागा रक्षाबंधनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना बांधली राखी :

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या रक्षाबंधनाकडे दरवर्षी राजकीय वर्तुळाचं लक्ष असतं. यंदाही पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. पंकजा यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनाही राखी बांधली. मंत्री अदिती तटकरे यांनीही धनंजय मुंडे यांना राखी बांधली.
आशीष शेलार अन् राम शिंदेंनीही साजरे केले रक्षाबंधन :

भाजपाचे नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या घरीही रक्षाबंधनाचा कौटुंबिक सोहळा पार पडला. त्यांच्या बहिणी वैशालीताईंनी आशिष शेलार यांना राखी बांधली.
दरम्यान, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पुण्यात आपल्या बहिणींकडून राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. बहिण-भावामधील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा बंध कायम घट्ट राहावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राजकारणात नाती अनेकदा पक्ष, भूमिका आणि राजकीय समीकरणांच्या चौकटीत पाहिली जातात. मात्र, रक्षाबंधनाच्या निमित्ताने या चौकटी काही काळ बाजूला ठेवून राजकीय नेत्यांनी कौटुंबिक नात्यांचा सण साजरा केला.













Leave a Reply