महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज सोमवारी (31 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर असून, शहरातील विविध महाविद्यालयांना भेटी देत आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी शिवाजीनगर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील अस्वच्छ स्वच्छतागृहे, अपुऱ्या सुविधा तसेच मेसमधील निकृष्ट अन्नाबाबत अमित ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या. विद्यार्थ्यांनी मेसमध्ये आढळलेल्या आळीचे फोटोही त्यांना दाखवले. कॅन्टीनमध्ये सडलेले कांदे आढळून आल्याने अमित ठाकरे आक्रमक झाले. त्यांनी हे सडलेले कांदे प्राचार्यांच्या कार्यालयात नेऊन महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला. विद्यार्थ्यांना आजच्या आज आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि चांगल्या दर्जाचं जेवण मिळावं. अन्यथा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला.
अमित ठाकरे शहरातील 7 महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. विविध ठिकाणी विद्यार्थी सेनेच्या शाखांचे उद्घाटन करून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या आणि विविध अडचणी जाणून घेऊन त्यावर विद्यार्थी सेनेची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. आज सकाळी त्यांनी शिवाजीनगर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि मेसमधील आळी दाखवली. तसेच वसतिगृहातील अस्वच्छतेची पाहणी केल्यानंतर अमित ठाकरे भावुक झाले.
यानंतर त्यांनी कॅन्टीनमधील सडलेले कांदे प्राध्यापकांच्या कार्यालयात नेऊन दाखवले. यावेळी प्राध्यापकांनी काम सुरू असून लवकरच पूर्ण होईल, असे सांगितलं. मात्र, यावर अमित ठाकरे आक्रमक झाले.
“विद्यार्थ्यांना चांगले जेवण आणि आवश्यक सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत. आजपासून विद्यार्थ्यांना चांगलं जेवण मिळाले नाही, तर हेच जेवण तुम्हालाही खावं लागेल. इथली परिस्थिती पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. आजपासून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत,” असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, अमित ठाकरे प्राध्यापकांच्या कार्यालयात महाविद्यालयातील समस्यांबाबत चर्चा करत असताना एका विद्यार्थ्याने कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का लावला आहे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर अमित ठाकरे यांनी फोटो पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी हा फोटो नको, असं सांगितलं. यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो तत्काळ काढला.
नंतर या प्रसंगाबाबत माध्यमांशी बोलताना अमित ठाकरेंनी सांगितलं की, “नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊ शकत नाही. शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल पण मग मोदींचा फोटो दुसरीकडे लावा. तो फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला नको”.













Leave a Reply