मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर प्रखर टीका केली आहे.

महेश तपासे म्हणाले की, एखाद्या यंत्राचा उपयोग बराच काळ केला नाही तर त्याला गंज लागते त्याच प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनलादेखील गंज लागलेलं आहे. इंजिनचा राजकीय पटलावर वापर न झाल्याने ते गंजले आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देणे म्हणजे लोकशाही विरोधातील लोकांना पाठिंबा देणे आहे असा टोला महेश तपासे यांनी लगावला. राज ठाकरे यांनी महायुतीला समर्थन देताना वास्तविक मोदींच्या नावाला समर्थन असल्याचे म्हटलं असलं तरी हे समर्थन गद्दारीला, बंडखोरीला, पक्ष चोरीला व गेल्या दिड वर्षात महाराष्ट्रात झालेल्या अधोगतीला दिले आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वीही वेगवेगळ्या राजकीय भूमिका स्वीकारल्या आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पटला नसल्याने राजीनामे दिले आहे असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी गुजरातला पळून नेण्यात येत आहे. यासंदर्भात राज ठाकरे का काहीही बोलले नाही असा प्रश्न निर्माण होतो. तसेच शेतकऱ्यांनी जीन्स घालून ट्रॅक्टर चालावे असे ठाकरे म्हणाले मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळणार यावर मात्र राज ठाकरे यांनी मोदींकडे का विचारणा केली नाही असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला. एखादा राजकीय विचार द्यायचा असेल तर तो शिक्षणाचा, समान संधीचा, रोजगारांचा, धर्मनिरपेक्षतेचा विचार असला पाहिजे दुर्दैवाने असा विचार राज ठाकरेंना देता आला नाही, त्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार न मिळाल्याने निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला असेही महेश तपासे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार लवकरच जाहीर होऊन तो भाजपच्या रणजीतसिंह निंबाळकर यांचा पराभव करेल असा विश्वास तपासे यांनी व्यक्त केला.