उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या तिसवाडी तालुक्यातील सुमारे १ लाख ५ हजार ८०० मतदार मंगळवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या तालुक्यात पणजी, ताळगाव, सांत आंद्रे, सांताक्रुझ आणि कुंभारजुवा असे पाच विधानसभा मतदारसंघ येतात. येथील मतदार केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरवात झाली.

दरम्यान, मतदारांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी मतदार केंद्रासमोर मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच, तापमानात वाढ असल्याने मतदारांना पाण्यासह लिंबू पाणी देखील देण्यात येईल. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली आहे. पणजी, ताळगाव, सांताक्रुझ आणि कुंभारजुवा हे विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे आहेत, तर सांतआंद्रे मतदारसंघ हा आरजी पक्षाकडे आहे. सांताक्रुझ आणि कुंभारजुवेत काँग्रेस विजयी झाली होती, परंतु आमदारांनी भाजपात पक्षांतर केले. ताळगावात काँग्रेसने बऱ्यापैकी मते मिळवली होती. तसेच सांतआंद्रे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.

त्याशिवाय पणजीत पक्षाचे पारंपरिक मतदार आहेत. सर्व मतदारसंघात यंदा अल्पसंख्याक खास करून ख्रिस्ती समुदायाचे मते भाजपच्या विरोधात जाण्याचे चिन्हे आहे. तसेच मगो पक्षाचेही अनेक पारंपारिक मतदार असून त्यांचे मन खलपांच्या बाजूने असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. श्रीपाद नाईक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतदान होऊ शकते. केंद्रात मोदी सरकार हवे म्हणून भाजपचे कार्यकर्ते त्यांना मतदान करणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील जोर लावला आहे.

पणजी आणि ताळगावात मंत्री बाबूश मोन्सेरात यांचा प्रभाव आहे, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित असा प्रचार झालेला नाही. सांताक्रुझमध्ये देखील रुडाल्फ फर्नांडिस यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झालेले नाही. कुंभारजुवेत राजेश फळदेसाई यांच्या समोर तर मोठे आव्हान आहे. त्या तुलनेत सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी प्रचारात जोर लावल्याचा दिसते.