डहाणू येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती भाजप महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करत मार्गदर्शन केले. २० तारखेची निवडणूक ही ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा याची निवडणूक नसून देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडायचा असून त्यासाठीची ही निवडणूक आहे. हा देश पुढच्या काळात कोणाच्या हातात द्यायचा, हा देश कोण सुरक्षित ठेवू शकेल, कोण देशाला कोण विकसित करू शकेल, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा कोड पूर्ण करेल, त्यासाठी नेता निवडण्याची ही निवडणूक आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच त्यांनी महायुती आणि इंडिया आघाडीला पांडव आणि कौरवांची उपमा दिली आहे.
सध्या निवडणुकीत दोन गट तयार तयार झाले आहेत. महाभारताच्या युद्धामध्ये ज्याप्रकारे त्यावेळी कौरव पांडवांच्या दोन सेना एकमेकांसमोर होत्या. त्याच प्रकारे आपल्या विश्वगौरव असलेले नरेंद्र मोदी एका बाजूला असून त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, राज ठाकरेंची मनसे, आठवलेंची रिपाई असे अनेक घटक पक्ष, अशी पांडवांची फळी आपण तयार केली आहे. दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात २४ ते २५ पक्षांची खिचडी आहे. नरेंद्र मोदी हे आमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार आहेत. पण तुमचे प्रधानमंत्री कोण आहेत हे सांगा, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित करुन महायुती म्हणजे पांडव आणि इंडिया आघाडी म्हणजे कौरव, अशी तुलना केली आहे.
संजय राऊतांवर टीका करत फडणवीस म्हणाले, पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर एक पोपटलाल सकाळी नऊ वाजता दररोज टीव्हीवर दिसतात. ते पोपटलाल म्हणाले आमच्याकडे प्रधानमंत्री पदासाठी खूप उमेदवार आहेत. आम्ही पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवू, पण पहिला कसा निवडाल हा माझा प्रश्न आहे. ते प्रधानमंत्री पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ खेळतील. संगीत बंद झाले की जो पक्ष पहिला खुर्चीवर बसला त्याचा पहिला प्रधानमंत्री जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री. हा खुर्चीचा खेळ नाही असे मला या वेड्यांना सांगायचे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, भाजप प्रभारी राणी दिवेदी आदींसह महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.