आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला असून त्याबद्दल अभिनंदन करतानाच दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रावहिनी पवार या निवडून येतील असे वाटत होते मात्र त्यांचा पराभव झाला आहे शिवाय इतर मतदारसंघातही पराभव झाला असून तो आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहे. लोकशाहीमध्ये जनमताचा आदर नेहमी केला जातो तो आम्ही करत आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीला मिळालेल्या पराभवानंतर दिली आहे. दरम्यान ज्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले त्याबद्दल उमेश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
देशभरात निवडून आलेल्या लोकसभा उमेदवारांचे अभिनंदन करतानाच निवडणूकीत एकमेकांवर झालेल्या टिकाटिप्पणी आणि जी टोकाची कटुता समोर आली आहे ती कटूता राहू नये. देशाच्या हिताकरिता संसदेमध्ये सर्वच खासदार काम करतील. देशाच्या प्रश्नावर पार्टी न पहाता देशहितासाठी काम करतील अशी अपेक्षाही उमेश पाटील यांनी व्यक्त केली.
पराभव झाला असला तरी पुन्हा पराभवाचे आत्मचिंतन करुन ज्या बाबी राहिल्या आहेत त्या दुरुस्त करून पुन्हा नव्या जोमाने सुनेत्रा पवार कामाला सुरुवात करतील असा विश्वासही उमेश पाटील यांनी व्यक्त केला.
निवडणुकीत जय-पराजय होत असतो. तो विनम्रपणे स्वीकारला पाहिजे. विजय झाला तर त्याचा उन्माद करायचा नाही आणि पराजय झाला म्हणून खचून जायचे नाही. आपला नेता हा वाघाच्या काळजाचा आहे. पराभव झाला म्हणून खचून जाणारा नाहीय. त्यामुळे आपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येणार्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊया असे आवाहनही उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.