अभिनेत्री जिनिलिया रितेश देशमुख प्रत्येक मराठी सण आपुलकीने साजरे करताना दिसते. गणपती असो, होळी असो किंवा वटपौर्णिमा पारंपरिक पोशाखात तयार होऊन जिनिलीया मोठ्या आनंदाने आपली मराठी संस्कृती कायम जपते. यामुळेच सोशल मीडियावर देखील तिचं नेहमी कौतुक केलं जातं. आज सर्वत्र वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सगळ्या महिला वटपौर्णिमा साजरी करतात. वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारून पतीच्या आयुष्यासाठी व सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी प्रार्थना करतात.

जिनिलीया देशमुखने त्यांच्या राहत्या घरी वडाची पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जिनिलीया वटपौर्णिमेसाठी नटून थटून तयार झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या नवऱ्यासाठी अभिनेत्री लिहिते, “माझे प्रिय नवरोबा रितेश… तुझ्याशिवाय एक दिवसही जाणं कठीण! तुम्हाला माझं आयुष्य ही लाभो #वटपौर्णिमा” या व्हिडीओला अभिनेत्रीने त्यांच्या ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” गाणं जोडलं आहे.