Breaking News

वरळीत राजकीय चिखल, पण कितीही चिखल असला तरी कमळ फुलू देणार नाही ; आदित्य ठाकरेंचा भाजपला इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तसेच विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत अगदी थोड्या मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं. याचवेळी भारतीय जनता पक्षावर त्यांनी हल्लाबोल केला. “वरळीत राजकीय चिखल, पण कितीही चिखल असला तरी कमळ फुलू देणार नाही”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी भाजपाला दिला.

‘वरळीत कितीही चिखल असला तरी कमळ येऊ देणार नाही.’, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. वरळीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून फुटबॉलच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी नीट परीक्षा गोंधळ, त्यांच्यासोबत वरळी मतदारसंघावरून भाजपवर निशाणा साधला.

वरळी मतदारसंघामध्ये इतर पक्षाची लोकं येऊ लागली आहेत. याप्रश्नावर उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी सांगितले की, ‘मी निवडणूक लढवताना म्हणालो होतो की वरळी सीट कशी आहे बघायला सगळे येतील. वरळी ए प्लस होताना सगळीकडून लोकं येतात. मी त्यांचे स्वागत करतो. मोठ्या लोकांनी इथे रोड शो पण करावा अशी मी विनंती करतो. वरळीमध्ये कितीही चिखल असला तरी याठिकाणी कमळ येऊ देणार नाही.’, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

नीट परीक्षेच्या गोंधळावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्राचे राजकारण दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात लूट चालली आहे. देशात देखील तिच परिस्थिती आहे. नीट परीक्षा, नेट परीक्षा आणि सीईटीचा मुद्दा आम्ही उचलून धरला आहे. परीक्षेवर चर्चा व्हायला पाहिजे. आज भाजप फक्त कोण कोणत्या धर्माचा, कोण कोणत्या जातीचा आहे. समाजाता काय चालले आहे यावर बोलत आहे. पण आज तरुण पिढी ज्या समस्येला तोंड देत आहे त्यावर कोणी चर्चा करत नाहीये. भाजप भूतकाळाविषयी बोलते आम्ही भविष्याबद्दल बोलतो.’, असेही ते म्हणाले.