आज सकाळपासून विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सायंकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक लढवत असल्याने प्रत्येक आमदाराच्या मताला महत्त्व प्राप्त झालं असून सर्वच उमेदवारांकडून मतांची गोळाबेरीज करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड हेदेखील मतदानाला येणार असल्याने वादंग निर्माण झालं आहे. गायकवाड यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेत जोरदार टीका केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात एका जमिनीच्या वादातून भाजप आमदार गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात शिंदे सेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. मात्र आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी त्यांनी कोर्टाकडून परवानगी घेतली असून ते मतदानासाठी येणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर चौफेर टीका केली आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात असताना त्यांना मतदान करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. मग आता गणपत गायकवाड यांना वेगळा न्याय का? असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी या मुद्द्यावरून महायुतीवर टीकास्त्र सोडलं आहे.

गणपत गायकवाड यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीकडून टीका सुरू होताच भाजपकडून आमदार अतुल भातखळकर यांनी पक्षाची बाजू मांडली आहे. “जेलमध्ये एखादा आरोपी असेल, तर तो निवडूनही येऊ शकतो. याआधी असं घडलंय. लोकसभेतही आरोपी तुरुंगात असताना तो निवडून आल्यानंतर शपथ घेण्याची परवानगी देण्यात आली होती. गणपत गायकवाड फक्त आरोपांखाली तुरुंगात आहेत. त्यामुळे कायद्याने त्यांना मतदान करण्याचा पूर्ण अधिकार आहे,” असा दावा भातखळकर यांनी केला आहे.