सध्या राज्यभर एक योजना चांगलीच गाजत आहे ‘ लाडकी बहीण योजना’ ! या योजनेबाबत राज्य सरकारने कौतुकाने अनेक गोष्टी सांगितल्या तर विरोधकांनी कडाडून टीका केली. आता यावर उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी अनेक कारस्थानं केली. ही योजना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही, असे ते म्हणाले. पुणे येथील या योजनेच्या कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीवर आरोपांची राळ उडवली.

लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी अनेक कारस्थानं केली. ही योजना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही. या योजनेत अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांनी विरोधकांनी योजनेत अडथळे आणण्यासाठी काय काय कारनामे केले, याचा पाढाच फडणवीस यांनी वाचला.

ते म्हणाले, आज खऱ्या अर्थाने सावित्रींच्या लेकींचा कार्यक्रम आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मानवंदना देतो. आज आनंदाचा दिवस आहे. लाडकी बहीण योजनेची औपचारिक सुरुवात पुणे येथून होत आहे. पुणेच का असं विचारलं गेलं. पुण्यातूनच आई जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली होती, महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला, तेव्हा फुले दाम्पत्यांनी याच पुण्यापासून महिलांना अधिकार देण्यास सुरुवात केली. मुलींची पहिली शाळा याच पुण्यातून सुरू झाली. त्यामुळे पुणे हे उपयुक्त शहर आहे. राजकारणच नाही तर समाजपरिवर्तनाची भूमी पुणे आहे. आपलं सरकार हे देनाबँक सरकार आहे. लेना बँक सरकार नाही. मागच्यावेळी वसुली करणारं सरकार होतं आता बहिणीला देणारं सरकार आहे. त्यामुळे पुण्यापासून सुरुवात करायची ठरवली.

सुरुवात केली तरी पैसे क्रेडिट करणं सुरू करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बहिणी खाली हात जाता कामा यने असं मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यंत १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात पैसे गेले आहेत. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही. हा आमचा निर्धार आहे. ३१ जुलैपर्यंतचे फॉर्म घेतले त्याचे पैसे आले. आता ३१ ऑगस्टच्या फॉर्मची छाननी होईल तेव्हा या महिलांना जुलै, औगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे येतील. ही खटाखट योजना नाही तर फटाफट योजना आहे. थेट पैसे खात्यात जातात, हे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही घोषणा केली तेव्हा सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना नाकारलं. त्यानंतर त्यांनी फॉर्म भरले आणि पुरुषांचे फोटो लावले. काही ठिकाणी मोटर सायकल आणि बगिच्यांचे फोटो लावले. जाणीवपूर्वक केलं गेलं. फॉर्म रिजेक्ट व्हावं म्हणून प्रयत्न सुरू होता. या लोकांनी पोर्टवरल जंक डेटा टाकला. त्यामुळे पोर्टल पाच सहा दिवस बंद होते. त्यांनी बोंब मारली, अशी आरोपांची राळ फडणवीस यांनी उडवली. आम्ही ऑफलाइन अर्ज घेऊन पोर्टलवर टाकले, असे ते म्हणाले.

अरे नालायकांनो आई आणि बहिणीचं प्रेम कोणीही विकत घेऊ शकत नाही. ही तर माता भगिनींप्रती आमची कृतज्ञता आहे. तुमच्या साथीनेच आम्हाला यश मिळतं. त्या यशाची ओवाळणी म्हणून आम्ही हे सहाय्य करतो. जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना १५०० रुपयांचं मोल समजू शकत नाही. जे हॉटेलात दोन दोन हजाराची टीप देतात, त्यांना मोल काय समजणार. त्यांच्या खिशात माल आहे. पण माझ्या माय माऊलीला १५०० रुपयांचं मोल समजतं. तुम्ही कितीही दुषणं दिली तरी जोपर्यंत माय माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठी आहे, तोपर्यंत आमचं कोणीही काही करू शकत नाही.

अजितदादांनी मार्चपर्यंतची पूर्ण व्यवस्था केली आहे. तुम्ही आशीर्वाद दिला तर २०२५ पर्यंतची व्यवस्था, नंतर २०२६ पर्यंतची नंतर २०२७ पर्यंतची व्यवस्था करू. बजेटमध्ये एकच वर्षाची तरतूद करता येते. पाच वर्षाच्या तरतुदीची सोय असती तर आम्ही पाच वर्षाची तरतूद केली असती. भाजपचं सरकार असलेल्या राज्यातील सर्व योजना सुरू आहेत. पण काँग्रेसने कर्नाटकात योजना सुरू केली पण नंतर बंद केली,असा टोला पण त्यांनी लगावला.